पान:भरतपुरचा वेढा.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रणजितसिंह मरण पावल्यावर त्याचा वडील मुलगा रणधीरसिंह गादीवर बसला, परंतु तो लवकरच मेल्यामुळे व त्यास संतति नसल्यामुळे त्याचा दुसरा भाऊ बलदेवसिंह सिंहासनारूढ झाला. बलदेवसिंह मरण पावला त्या वेळी, त्याचा पुत्र बलवंतसिंह हा अगदी लहान होता. बलदेवसिंह जीवंत असतांना त्यास असा संशय उत्पन्न झाला की, आपल्या पश्चात् , आपल्या घराण्यांतील इतर लोक आपल्या मुलास गादीवर बसू देणार नाहीत, व यासाठी त्याने इंग्रज सरकारास, आपण मेल्यावर आपल्या मुलास गादीवर बसविण्याची विनंति केली होती. त्याप्रमाणे, बलदेवसिंह मृत्यु पावल्यावर, इंग्रजांनी त्याचा मुलगा बलवंतसिंह यास भरतपुरच्या गादीवर बसविलें. भरतपुरच्या युद्धाचा, इ. स.१८०५ त, तह होऊन निकाल झाल्यावर, इ. स. १८२५ पर्यंतच्या वीस वर्षांत, भरतपुराशी इंग्रजसरकारचा कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता, तो बलवंतसिंह यास त्यांनी गादीवर बसविल्यामुळे पुनः उत्पन्न झाला. इ. स. १८२५ च्या मार्च महिन्यांत, भरतपुर शहरांत एक अघटित घटना घडून आली. स्वर्गवासी महाराणा रणजितसिंह याचा तिसरा मुलगा लक्ष्मणसिंह याचा मुलगा मधुसिंह याने राजघराण्यांतील इतर लोकांच्या साहाय्याने, बलवंतसिंहास पदच्युत करण्याचा बेत केला. या आपसांतील वैषम्यामुळे, भरतपुरच्या राजवंशास फार शोचनीय स्थिति प्राप्त झाली. मधुसिंह हा भरतपुरांतील सर्व राजद्रोही लोकांचा पुढारी बनला, व तो बलवंतसिंहास आतां पदच्युत करणार इतक्यांत, त्याचा महत्वाकांक्षी व शूर वडील भाऊ दुर्जनसाल यास सिंहासनारूढ होण्याची इच्छा उत्पन्न झाली, व त्यानें बलवंतसिंहाची आई व राजवंशांतील तत्पक्षीय इतर लोक या सर्वांची कत्तल उडविली ! येवढे झाल्यावर, भरतपुरचे राज्य