पान:भरतपुरचा वेढा.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हे वर्तमान ऐकतांच, भरतपुरचा राजा रणजितसिंह यास मोठी चिंता उत्पन्न झाली. त्याचा खजिना, या वेळी, अगदी रिकामा झाला होता, व पुष्कळ प्रजाजन इंग्रजांकडून मारले गेले होते, यामुळे आतां लढाई करण्याचा प्रसंग न येईल तर बरें असें त्यास वाटत होते, व इंग्रजांशी तह करून हे प्रकरण एकदांचे मिटबून टाकावे, अशा उद्देशाने त्याने आपल्या तिसऱ्या मुलास लॉर्ड लेक याजकडे पाठविले. लॉर्ड लेक यास तेंच पाहिजे होते. त्याने तहास तत्काळ आपली अनुमति दिली, व जाटांचा व इंग्रजांचा तह होऊन लढाईचा प्रसंग टळला. या तहाची कलमें येणेग्रमाणे होती:-'डीग हा किल्ला सध्या इंग्रजांच्या ताब्यांत आहे, परंतु महाराणा रणजितसिंह जर आजपासून इंग्रजांशी मित्रत्वानें वागण्याचे कबूल करील तर हा किल्ला त्याचा त्यास परत दिला जाईल. इंग्रजांस विचारिल्याशिवाय रणजितसिंहाने, आपल्या लष्करांत दुसऱ्या कोणा युरोपियनास विलकूल जागा देऊ नये. लढाईच्या खर्चाबद्दल जाटांनी इंग्रजांस २० लक्ष रुपये द्यावे; यांपैकी तीन लक्ष रुपये आज द्यावे व बाकी १७ लक्ष मागाहून द्यावे. या कलमाप्रमाणे आपण वागू, याबद्दल जामीन ह्मणून महाराणा रणजितसिंहाने आपला एक पुत्र दिल्ली अथवा आग्रा येथील इंग्रज सेनापतींच्या स्वाधीन करावा.' तहाची ही सर्व कलमें, इंग्रजांस अनुकूल आहेत. चारी युद्धांत विजयी होऊनही, महाराणा रणजितसिंह याने ही कलमें कशी मान्य केली, याचे मोठे आश्चर्य वाटते. वास्तविक पाहता, या वेळी, जाटांचा पक्ष विजयी होता व ते ह्मणतील तसा तह करून देणे इंग्रजांस भाग पडले असते. असे दिसते, परंतु ज्याअर्थी प्रस्तुत तहाची कलमें जाटांस प्रतिकूल व इंग्रजांस अनुकूल अशी दिसतात, त्या अर्थी जाटांच्या जयाची जी गोष्ट लिहिली आहे, तीत बरीच अतिशयोक्ति असली पाहिजे.