पान:भरतपुरचा वेढा.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० प्रकरण आठवें. ___ इंग्रजी सैन्याचा चार वेळ पराभव झाल्यामुळे, भरतपुरांतील जाट लोकांत आनंदीआनंद होऊन गेला होता. इंग्रजी लष्करांत मात्र एकच हाहाःकार उडून जाऊन केवळ निराशेचा काळोख पसरला होता ! इकडे भरतपुर नगर विजयानंदरवाने दुमदुमून राहिले होते. पुनः पुनः चार वेळ, इंग्रजी सैन्यास माघार घ्यावी लागल्यामुळे, इंग्रजांचे ३,१०० योद्धे व शिपाई मेले होते व घायाळ झाले होते. ही संख्या इंग्रज इतिहासकारांनी दिलेली आहे, परंतु जाट लोक असे सांगतात की, चार वेळ झालेल्या युद्धांत इंग्रजांचे अगणित वीर मेले होते, भरतपुर दुर्गासभोवतालचा खंदक प्रेतांनी भरून गेला होता, व त्या प्रेतांवरून, पाण्यास स्पर्श न करितां शहरांतील लष्करी लोक खंदक ओलांडून जात होते! एकंदरीत, इंग्रजांचे नुकसान कितीही झालेलें असो, परंतु जाटांनी आपला चार वेळ पराभव केला, ही गोष्ट इंग्रज इतिहासकार प्रांजलपणे कबूल करितात. अशा प्रकारे पराजित होऊन हजारों शिपाई मरण पावल्यामुळे सेनापति लॉर्ड लेक याचे धैर्य अगदी खचून गेलें! आतां करावें तरी काय, या विचाराने तो अगदी हैराण झाला. दारूगोळा खलास झाला, तोफा अगदी निरुपयोगी होऊन गेल्या, व अन्नसामुग्री तर अजीवाद संपली ! मग आग्र्याहून रसद आणविण्याची लॉर्ड लेक याने तयारी चालविली. त्याने बरेच दिवस विचार करून, पुनः एकवार जाटांशी दोन हात करण्याचा निश्चय केला; परंतु इतक्यांत जाट सैन्याने हल्ला करून इंग्रजांचा तोफखाना जाळून टाकिला, व लॉर्ड लेक यास आपली छावणी सोडून तटापासून सहा मैलांवर जाऊन राहणे भाग पडले. लॉर्ड लेक साहेब शहरावर पुनः चाल करणार आहे,