पान:भरतपुरचा वेढा.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९ तेल तापून सळसळू लागतांच ते मोठमोठ्या पिचकांत भरून त्याचा वर्षाव इंग्रजी सैन्यावर जाटांनी सारखा सुरू केला ! या वर्षावानें, इंग्रजी सैन्यांत एकच गोंधळ उडून जात आहे तोच, मातीच्या मडक्यांत दारू भरून त्यांस आग लावून, ती मडकी इंग्रजी सैन्यांत फेंकण्याचा जाटांनी सपाटा चालविला ! ! ही मडकी, इंग्रजी शिपायांच्या मस्तकांवर पडून फुटू लागल्यामुळे आंतील दारूच्या भडाक्याने अनेक शिपाई जळून मरूं लागले, व जिकडे तिकडे एकच हाहाकार उडाला. इंग्रजी सैन्याचे युद्धक्षेत्र केवळ विषममृत्युमय अग्निक्षेत्र बनून गेलें ! विद्युत्पात झाल्याने वृक्ष जसा कडकडून मोडून पडावा तसे इंग्रजी शिपाई या अग्निपातानें धारातीर्थी पतन पावू लागले. कोणी लांकडाचे ओंडे मस्तकावर आदळल्यामुळे जागच्या जागी मरण पावले. कोणी, वणव्यांत सांपडून हरिण जसे भाजून मरतात, तसे तप्त तैलाच्या वर्षावाने भाजून मेले ! कोणी मेले आहेत, कोणी मृत्युपंथास लागले आहेत व कोणी मृत्यूची मार्गप्रतीक्षा करीत जमिनीवर पडून राहिले आहेत, असा शोकजनक देखावा इंग्रजी सैन्यांत दिसू लागला. जाटांच्या या भयंकर अग्निवर्षावाने दोन तासांत अनेक शिपाई मृत्युमुखी पडल्यावर, कर्नल मॅन्सन् याने इंग्रजी सैन्यास, आपल्या गोटाकडे परत जाण्याचा एकदम हुकूम केला. या चौथ्या वेळीही पराजय प्राप्त झाल्यामुळे लज्जित होऊन इंग्रजी सैन्य, प्राणरक्षणार्थ पळून गेलें ! या प्रसंगी इंग्रजांचे ६९ गोरे व ५६ काळे शिपाई मरण पावले व ४१० गोरे व ४५२ काळे शिपाई घायाळ झाले. याशिवाय ६ गोरे कामगार मारले गेले व २८ घायाळ झाले. एकंदरीत, या खेपेसही इंग्रजांस यश आले नाही.