पान:भरतपुरचा वेढा.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या वेळी, तटाच्या पडक्या भागांतून आंत घुसण्याचे विकट काम, ब्रिगेडियर मॅन्सन् याजवर सोपविण्यांत आल्यामुळे, सर्व गोरे शिपाई व मुंबई व बंगाल खात्यांचे काळे पायदळ बरोबर घेऊन त्याने खंदक ओलांडण्याचा प्रयत्न आरंभिला. तटाजवळील ज्या चौथऱ्यांवर तोफा चढवून जाटांनी इंग्रजी सैन्याचा धुव्वा उडवून दिला होता, त्या चौथऱ्यांनजीकचा तट तुटून जाऊन तेथे एक मोठे खिंडार पडले होते. इंग्रजी सैन्य या ठिकाणी येऊन पोहोंचलें व सर्वांनी अशी घोर प्रतिज्ञा केली की, या खिंडारांतून आंत शिरून शहर हस्तगत करूं एक, किंवा तसे न झाल्यास मरून तरी जाऊं एक ! जाटांचा तोफा ठेवण्याचा बुरूज फार उंच होता. इंग्रजी सैन्यांतील सर्व वीरांनी या चौथऱ्याच्या शिरोभागीं चढून जाण्याचा प्रयत्न एकसमयावच्छेदेंकरून सुरू केला. सैन्यांतील अनेक शिपाई एकाच्या खांद्यावर दुसरा, दुसऱ्याच्या खांद्यावर तिसरा, याप्रमाणे वर चढू लागले ! कित्येक तटाच्या पडक्या भिंताडाच्या आधाराने वर चढू लागले ! परतुं सर्व व्यर्थ ! तटांतील जाटांनी, 'जयजय' शब्दाच्या घोषाने दशदिशा दणाणून टाकिल्या व लांकडांचे मोठमोठे तुकडे तटावरून खाली लोटण्याचा सपाटा सुरू केला ! कितीएक जाटांनी, इंग्रजी सैन्यावर बंदुकीच्या गोळ्यांचा भडिमार सारखा चालू ठेविला व कित्येकांनी, मोठेमोठे दगडच खाली लोटण्याचा सपाटा चालविला ! ! इकडे इंग्रजी तोफांच्या गोळ्यांनी तटास जेथे भेगापडत चालल्या होत्या, तेथे त्या भेगांतून आत शिरण्याचा कित्येक साहसी इंग्रजी शिपायांनी प्रयत्न चालविला होता ! कितीएक शिपाई तर तटाच्या माथ्यापर्यंत चढले होते, परंतु जाटांच्या शस्त्रास्त्रांच्या माऱ्याने त्यांस पटापट आपले प्राण सोडावे