पान:भरतपुरचा वेढा.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ तीन वेळ पराभव केला, तरीही इंग्रज सेनापति लॉर्ड लेक याचे धैर्य तिळमात्र खचले नाही. तिसऱ्या खेपेस जर जाटांनी आपल्या युद्धकौशल्याची शिकस्त करून इंग्रजी सैन्यास मागे हटविलें नसते, तर त्याच वेळी भरतपुर इंग्रजांच्या हाती गेले असते, यांत बिलकूल संशय नाही. एकामागून एक असे तीन अपजय प्राप्त झाल्यामुळे इंग्रजी सैन्य अगदी निरुत्साह होऊन गेले होते, व त्याजवर अंमल चालविण्याचे काम फार कठिण झाले होते. तथापि, सेनापति लॉर्ड लेक याने कोणावरही न रागावतां आपल्या सर्व शिपायांस एकत्र करून, त्यांस मधुर शब्दांनी झटले, 'आज तुझांस जसा वाईट वेळ प्राप्त झाला आहे, तसा वाईट वेळ इंग्रजी सैन्यास आजपर्यंत कधीही प्राप्त झाला नव्हता. तुझीं, 'ब्रिटिश सैन्य' या नांवास जो कलंक लाविला आहे, तो आतां काढून टाकणे केवळ अशक्य झाले आहे. तुमच्या चुकीमुळे इंग्रजांस विजयलक्ष्मी सोडून गेली आहे. असो; गोष्ट होऊन गेली, त्याजबद्दल आतां पश्चात्ताप करून काय उपयोग ? तथापि, आणखी एक वेळ, मोठ्या नेटानें किल्ला घेण्याचा प्रयत्न करावा, अशी माझी इच्छा आहे.' सेनापतिसाहेबांचे हें मर्मस्पर्शी भाषण ऐकतांच, सर्व शिपाई अगदी लज्जित व व्यथित होऊन खालीं माना घालून उभे राहिले. सर्वांनी नव्या उत्साहाने पुनः युद्धांत शिरून प्राण देण्याची प्रतिज्ञा केली. लेफ्टनंट टेम्पल्टन् याने सर्व सैन्याचे अग्रेसरत्व घेतले. निराशारूपी अंधकारांत सर्व लोक चांचपडत पडले असतां, एकाएकी उत्साह सूर्य उदय पावला, व त्याच्या प्रकाशाने पुनः भरतपुरावर चाल करण्याचा मार्ग दृग्गोचर होऊ लागला.