पान:भरतपुरचा वेढा.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रुंदी पुष्कळ वाढविली होती. हा सर्व प्रकार पाहून इंग्रजांस जरी मोठे आश्चर्य वाटले तरी त्यांचा धीर खचला नाही. त्यांच्या सैन्यांतील एका शिपायानें खंदकांत बुडी मारून पाण्याची खोली पाहिली, ती आठ फूट भरली. खंदक फार खोल नाही, असे समजतांच दुसऱ्या अनेक शिपायांनी भराभर आंत उड्या टाकिल्या. इकडे, जाट लोकही स्वस्थ बसले नव्हते. त्यांनी, खंदकांत उड्या टाकणाऱ्या शिपायांवर, बंदुकींचा गोळीबार सुरू केला व त्यामुळे इंग्रजी सैन्याच्या रक्तानें खंदकाचे पाणी तांबडे भडक होऊन गेलें! आतां, हे साहस करण्यांत कांही अर्थ नाही, असें दृष्टोत्पत्तीस येतांच, कप्तान लिंड्से यानें, आपल्या सैन्यास, खंदकांतून बाहेर पडून जाण्याचा एकदम हुकूम केला. त्याबरोबर इंग्रजी सैन्य बाहेर जाऊं लागले; परंतु पळतां पळतां त्यांतील शेकडो शिपाई, जाटांच्या बंदुकांस बळी पडले. खंदकांत उतरलेले कामगार व शिपाई मिळून ५१७ असामी तेथल्या तेथे ठार मारले गेले, व त्यांची प्रेते, खंदकांतील रक्तोदकावर तरंगू लागली ! इकडे हा प्रकार होत आहे तो, दुसरीकडे, इंग्रजी घोडेस्वारांची व जाटांचा राणा रणजितसिंह, होळकर व अमीरखान यांच्या सैन्याची लढाई जुंपण्याचा प्रसंग आला होता, परंतु तो टळला. इंग्रजी सैन्याच्या आणखी एका तुकडीनें, तिसऱ्या एका ठिकाणी, तटाच्या आंत शिरण्याचा प्रयत्न केला होता, परंतु खंदकांतील पाण्यास भिऊन शेवटी या तुकडीला मागे फिरावे लागले, व त्या वेळी जाट लोकांनी त्यांतील पुष्कळ शिपाई ठार मारिले ! एकंदरीत, या दुसऱ्या हल्यांतही, जाटांनी इंग्रजांचा पराभव केला.