पान:भरतपुरचा वेढा.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पतीने शहराच्या तटावर तोफांच्या गोळ्यांचा पाऊस पाडण्यास प्रारंभ केला. हा मारा तटाच्या पश्चिम व दक्षिण द्वारांवर सारखा चालू असतां, ता० ९ जानेवारी १८०५ रोजी, तटास एक खिंडार पडलेले इंग्रजी सेनापतीच्या दृष्टीस पडले. संध्याकाळी ७ वाजतां, इंग्रजी सैन्य आंत घुसूं लागलं. या सैन्याचे तीन भाग केले होते. पहिल्या भागाचा अधिकारी लेफ्टनंट कर्नल रिपन हा असून, त्याच्या हाताखाली २४० गोरे शिपाई व देशी शिपायांची एक पलटण, येवढें सैन्य होते. तटास खिंडार पडतांच, पहिल्याने हा रिपन साहेब आपल्या सैन्यासह आंत घुसला. दुसऱ्या भागाचा सेनापति मेजर हॉक्स हा दोन गोऱ्या पलटणी व दोन देशी पलटणी, इतकें सैन्य घेऊन दक्षिण दिशेकडून आंत शिरण्याचा प्रयत्न करूं लागला. तेथेच होळकरांच्या सैन्याचा तळ असून, त्यांस हांकून देऊन त्यांच्या सर्व तोफा आपण हिसकून घेऊ, अशी मेजर हॉक्स यास धमक होती. हे दोन सेनापति तटाच्या आंत घुसत आहेत, तोंच तिसरा सेनापति मेटलेन्ड हाही ५०० गोरे व १,००० काळे शिपाई बरोबर घेऊन त्यांस साहाय्य करण्याकरितां निघाला. ती रात्र काळोखी असून, तीन्ही इंग्रज सेनापति तटाबाहेरील खंदक ओलांडून आंत शिरण्याचा प्रयत्न करीत असतां, तटावरून जाट लोकांनी तोफांचा भयंकर मारा त्यांजवर सुरू केला. हा मारा रात्रीचे सात वाजल्यापासून बारा वाजतपर्यंत चालू असून, त्यामुळे इंग्रजी सैन्याची अगदी दाणादाण उडून गेली ! सेनापति मेटलेन्ड याचे सैन्याची तर इतकी दुर्दशा झाली की, त्यांतील बहुतेक शिपाई आपापले जीव वाचविण्याकरितां, सेनापति रिपन व हॉक्स यांच्या सैन्याकडे पळून गेले, व स्वतः मेटलेन्ड यांसही तोच मार्ग धरावा लागला. इतक्यांत या सैन्यांतील