पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ४ ]

त्यांवर लहान लहान पुस्तकें लिहितील तर बरें होईल. मात्र प्रस्तुत ग्रंथरचना-पद्धतींत लहान विद्यार्थ्यांना सुगम नाहीं व प्रौढ मनुष्यांना हवी तशी चिकित्सकपद्धति नाहीं असा एक दुहेरी दोष इतर गुणांबरोबरच यांत येत आहे, येवढे मांत्र सांगणें जरूर वाटतें. तथापि, ग्रंथकर्त्याच्या हेतूप्रमाणें तें तरुण विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल व आवडेल यांत शंका नाहीं.

ता. १९ | १ | २३. न. चिं. केळकर.

 रा. रा. गंगाधर रामचंद्र साने, बी. ए. यांनीं ' भगवान् श्रीकृष्ण ' या नांवाचें एक लहानसें पुस्तक लिहून नुकतेंच प्रसिद्ध केले आहे. पुस्तकाच्या नांवावरूनच त्यांतील विषय समजण्यासारखा आहे. हे पुस्तक आम्ही साद्यंत वाचून पाहिलें. रा. साने यांनीं कांहीं महिन्यांपूर्वी 'कमला' या नांवाची एक लहानशी सामाजिक कादंबरी लिहून प्रसिद्ध केली. तिच्या प्रस्तावनेंत आम्हीं रा. साने यांच्याविषयीं आशा प्रदर्शित केली होती कीं, त्यांच्या हातून उत्तरोत्तर अधिक सरसव निर्दोष ग्रंथरचना होईल. प्रस्तुतच्या कृष्ण-चरित्रानें ती आशा विफल केली नाहीं ही संतोषाची गोष्ट आहे. प्रस्तुत लेखांत कृष्णजन्मापासून तो भारतीय युद्धापर्यंतचें श्रीकृष्णाचें चरित्र वर्णिलेलें आहे. व्यासकृत श्रीमद्भागवत, महाभारत व हरिवंश हे संस्कृत ग्रंथ, व नामदेव, श्रीधर, वामनपंडित, तुकाराम, मोरोपंत, मध्वमुनीश्वर, अमृतराय इत्यादि मराठी ग्रंथकारांच्या कृष्णचरित्रपर कृति, यांच्या आधारानें प्रस्तुत पुस्तक लिहिले आहे. कंसाचें क्रौर्य, कृष्णजन्मप्रसंग, वृंदावन-विहार, कालियामर्दन, कंसवध, अक्रूरसंदेश, कालयवनहनन, रुक्मिण्यादिविवाह, सुदामचरित्र इत्यादि प्रसंगांचीं या पुस्तकांतलीं वर्णनें हृदयंगम आहेत. त्यांत कथानुरोधानें भयानक, वत्सल, शांत, अद्भुत, वीर, करुण इत्यादि रसांचा उठाव झालेला आहे. श्रीकृष्णाचे आदर्शभूत गुण म्हणजे त्याचें अलौकिक ज्ञान व वक्तृत्व, त्याची राजनीतिकुशलता, त्याची सर्वथा निस्वार्थबुद्धि, त्याचा अतुल पराक्रम, सज्जनपरित्राण व खलसंहार या -