पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ २ ]

ण्याच्या मार्गास लागला आहे असें, तविषयक योग्य वाङ्मयाची मंद प्रगति पहातां कोणासही म्हणतां यावयाचें नाहीं. अशा प्रकारचीं पुस्तकें जितकीं अधिकाधिक निघतील तितकीं तीं हवींच आहेत. या दृष्टीनें रा. साने यांचें पुस्तक वाचून पहातां मला ते उपयुक्त व वाचनीय झाल्याचें आढळून आलें.
 आबालवृद्ध, स्त्री पुरुष कोणाही भारतीयास श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या चरित्राइतकें प्रिय व मनास सात्त्विक स्फूर्ति देणारें दुसरें तें काय असणार ? श्रीमद्भगवद्गीतेच्या १० व्या - ' विभूति- योगा ' च्या अध्यायांत खुइ भगवंतांनींच ‘ रामः शस्त्रभृतामहम् ' आणि 'वृष्णीनां वासुदेवोऽस्मि' अशा रीतीनें आपल्या या दोन अवतारविषयक विभूतींचें वर्णन केलें आहे; आणि अर्जुनानेंही, अशा त-हेच्या विभूतींचे वर्णन करण्याविषयीं श्रीकृष्णास प्रार्थिलें त्या वेळीं 'भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नाऽस्ति मेऽमृत' - म्हणजे, 'तुझ्या अनंत विभूति व त्यांचें माहात्म्यरूपी अमृत वर्णेद्रियद्वारां प्राशन करीत असतां माझी तृप्तीच होत नाहीं, तरी तें पुनः एकदां सांग. ' असें भगवंतांस म्हटले आहे. अर्जुनाच्या रूपानें प्रत्येक आर्यहृदयाचीच ही मनोवृत्ति व्यक्त झाली आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं.
 रा. साने यांनीं भगवान् कृष्णचरित्र साध्या व सुसंगत कथानकाच्या रूपानें लिहिले असून, भाषाशैली चटकदार व आकर्षक आहे. तसेंच, श्रीकृष्णचरित्रांतील निरनिराळ्या प्रसंगांचें रम्यत्व व व्यावहारिक बोधपर रहस्य वाचकांच्या मनांवर ठसविण्यासाठी त्यांनीं योजलेली तात्त्विक विचारात्मक व काव्यमय भाषाशैली आणि केलेलीं उठावदार वर्णनें ( उ०श्रीकृष्णजन्म, गोकुळवर्णन, रासक्रीडावर्णन, इ. ) फार परिणामकारक झाली असून या प्रतिपादनाच्या ओघांतच त्यांनीं जीं प्रसंगोपात्त श्रीधर, एकनाथ, मोरोपंत, वामन, नामदेव इ० जुन्या साधुसंत व प्रासादिक सत्कवींचीं आणि कै. अण्णासाहेब किर्लोस्कर, रे. टिळक, व 'गोविंदाग्रज ' इ. अलीकडील सहजमधुरकाव्यरचनासंपन्न सत्कवींचीं शोभापोषक वचनसुमनें विखरून दिलीं आहेत, त्यायोगानें तर सहृदय वाचकांला विशेष