पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ २१ ]

तिच्या मस्तकावरील फुलें जमिनीवर गळून पडत होती. पण त्याच वेळीं बाळकृष्णाविषयीच्या अपत्यप्रेमसमाधी॑त ती इतकी बुडून गेलेली होती, त्या फुलांबरोबर त्यांच्याच इतके पवित्र, कोमल, मृदु व मनाला उन्नति देणारे असे प्रेमाश्रु तिच्या नेत्रांतून गळत होते ! इतक्या तन्मयावस्थेत परमात्मा तरी आपल्या भक्ताला कसा विसरेल ? ताबडतोब दुडदुड धांवणाऱ्या बालकृष्णानें मागून येऊन यशोदेच्या हातांतली रखी धरली ! “ गळती नेत्रांतूनी प्रेमाश्रुजळें, फुलें शिराहूनी । ऐसें मंथन करितां श्रीकृष्ण घरी रवीस बाहूंनीं " असे पंतांनीही त्याचें रम्य वर्णन केलें आहे. पण आपल्यावर यशोदेचें खरें प्रेम किती आहे याची पारख करण्याचेंच आज प्रभूर्ती ठरविलें होतें म्हणून त्यांनी तिला त्यावेळीं प्यावयास मागितलें. ते तिने दिलें. याप्रमाणें यशोदा कृष्णाला पाजीत बसली होती; समोरच अग्नीवर दूध तापत होतें. श्रीकृष्णानीं यशोदेची परीक्षा पाहण्यासाठी मातृस्तनपान करतां करती हल.केंच डोळ्यांनी अग्नीला वाढण्याची - प्रज्वलित होण्याची खूण केली. यजमानांची आज्ञा झाल्याबरोबर हुकमाचा ताबेदार हुताशनी धडधड जळूं लागला व क्षणार्धीत चुलीवरील दूध उतूं जाऊं लागलें. इतक्यांत “ अगबाई, दूध उतूं चालले वाटतें " असे म्हणून जगदीशास चद्दिशी मांडीवरून खालीं लोटून देऊन यशोदा त्या दुधाकडे धांवली ! अरेरे, मातोश्री ” देव स्वताशींच म्हणतात " एकूण माझ्यापेक्षां तुमचें दुधावर जास्त प्रेम आहे तर ! पण स्वस्वरूपाचें अज्ञान असले म्हणजे अशा गोष्टी व्हायच्याच. अथवा स्त्रीस्वभावच असा काय ? स्वर्गाला जाणाऱ्या तुकोबांनीं अगदी शेवटीं सुद्धा आपल्या भार्येस आपल्याबरोबर वैकुंठास चलण्याची विनंति केली असता त्यांची पत्नी जिजाई संसारांतच कशी गुरफटून राहिली हे आपणास ठाऊकच आहे. तसाच कांहींसा प्रकार इथेही झाला. अस्तु. पण त्यानें श्रीकृष्णास राग आला. आपणास पाजीत असतां अर्धवट टाकून यशोदा उठली याचा त्यांस राग येऊन ( दामोदरत्व पत्करण्यासाठी ) त्यांनी त्याच रवीनें त्या रागाच्या सपाट्यांत समोरचें मडकें फोडलें ! त्यावेळेस यशोदेच्या रागास काय विचारतां ? " थांब हं कृष्णा, तूं अलीकडे फार माजला आहेस, ज्याचीं त्याचीं तूं मडकीं फोडतोस ! थांब तुला एकदां चांगलेंच चवदावें रत्न दाखवलें पाहिजे. त्याशिवाय नाहीं तूं वठणीवर यायचास !" असे म्हणून जवळच पडलेली कामटी उचलून यशोदा कृष्णाला मारण्यास धांवली; तो तो गुलाम केव्हांच धूम पळाला होता. पण यशोदेनें आज जणों श्रीकृष्णशासनाचा निश्चयच केला होता ! कारण, ती तशीच त्याच्या पाठीस लागली व दोघांची धावपळ