पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १९ ]

लाही मृत्यु देणाऱ्या ' परमात्म्यास असल्या क्षुद्र उपायानें काय होणार ? ज्याच्या कृपेनें " विषमप्यमृतं क्वचित् भवेत् " त्याला विष काय बाधा करूं शकणार ? त्यानें तें पूतनेचे स्तन तिच्या इच्छेनुसार चोखण्यास आरंभ केला व ते इतके सपाटून चोखले कीं त्याबरोबर प्रभून तिचे प्राणही शोषले. तिच्या स्तनास तिडीक लागली व हातपाय झाडीत त्या वेदनांनीं ती शेवटीं धाडकन गतप्राण होऊन पडली !" नयनें फिरवी, झाडी करचरण, म्हणे पुरे, रडे, तदपी । न करी पुरे, न सोडी, गोडी आणोनि असुहि मास्पद पी ।।' मोठा शब्द करोनी क्षितिवरी साकोस पूतना पडली " असें । पंतांनींही त्याचें वर्णन केलें आहे. मला विष पाजून ठार मारणार होतीस नाहीं का ? भोग आतां आपल्या पापाचें फळ ! " देव स्वतांशींच म्हणाले. इतक्यांत त्या राक्षसीच्या धाड्कन पडण्याच्या आवाजानें यशोदा बाहेर धांवून आली व पहाते तो हा प्रकार. “ परमेश्वराच्या कृपेनेंच (!) हे अरिष्ट टळले " असें वाटून तिचा जीव खाली पडला. व तिनें आमच्या बालपणींच पराक्रम गाजविणाऱ्या प्रभूस प्रेमानें उचलून पोटाशी धरलें व त्याची दृष्ट काढली !

 अशा रीतीनें पूतनेची व्यवस्था लागल्यावर कंसास फार वाईट वाटलें. कारण त्यानें मोठ्या उमेदीनें पुतनेस पाठविलें होतें व तिनेंहि " मी बिनहरकत काम करत्यें तुम्ही कांहीं काळजी करूं नका " असे सांगितल्यावरून एव्हांनी आपला शत्रु-कृष्ण-त्या विषप्रयोगांनीं मेला सुद्धां असेल अशा गुळचट आशेच्या मनोराज्यांत कंस गुंग झाला होता. पण पूतनेच्या मृत्यूची बातमी येऊन पोंचल्याबरोबर - या ' प्रथमग्रासे मक्षिकापाता ' नें—त्या मनोराज्यांतील भव्य मनोरे कोंसळून जमीनदोस्त झाले व पुन्हां वस्तुस्थितीचें भयाण चित्र त्याच्यापुढें 'आ' पसरून उभे राहिलें ! तथापि तो जातीचाच दुष्ट असल्यामुळे एवढ्या तेवढ्या यत्नवैफल्यानें तो डगमगणारा नव्हता. त्यानें लगेच “ माबळभटास " बोलावून आणलें व त्यास पुन्हां कृष्णहननाच्या कामगिरीवर पाठविलें. माबळभटही कंसाचाच भट तो ! तो तडक निघाला व ज्योतिषी सामुद्रिक बनून त्यानें यशोदेच्या घरीं प्रवेश करून घेतला व श्रीकृष्णाचे हातावरून सामुद्रिक पाहण्याचे मिषानें तो त्यास ठार मारणार होता. वास्तविक गर्गाचार्यांनी पूर्वीच कृष्णाचें जातक वर्तवून त्या श्यामसुंदर प्रभूच्या श्रीवत्सलांछनदिक चिन्हांवरून हा साक्षात् ईश्वरावतार आहे असे सांगितलेंच होतें. पण हात दाखवण्याचें व पत्रिका पाहण्याचें वेड मोठें अनावर असते ! त्यांतून प्रभु एकुलते एक व यशोदेचें लाडकें बालक ! मग काय विचारतां ? पण ईश्वराचा अवतार ईश्व-