पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १८ ]

तांना सुद्धां मध्येच थांबून मातेकडे बघत त्याच दुग्धाचा फूत्कार सोडून तो घनश्याम परमात्मा मातेस रिझवीत असे. पंतानीं राम प्रभूच्या बाल्यावस्थेचें वर्णन करतांना " पीतां स्तनातें क्षणमात्र राहणें | महादरें मातृमुखासि पाहणें । वक्त्रांत तें दुग्ध तसेंचि वाहणें । येणेंचि फूत्कार करोनि नाहणें ॥ मुखांतुनी दुग्ध गळे सुनिर्मळ | उरावरी ये अति शुभ्र वोगळ । मंदाकिनीचा गगनीं प्रवाह तो । चंद्र प्रभा पांडुर काय वाहतो इत्यादि केलेलें वर्णन कृष्ण प्रभूसही तितकेंच लागू पडत नाहीं असे कोण म्हणेल ?

 इकडे आपल्या कंसाची स्थिति काय होती ? तो जरी वरकरणीं हास्य दाखवी तरी त्याच्या हृदयांत भयानें धडकीच भरली होती. त्यांत आपल्या शत्रूचे बारसे होऊन त्याचें " कृष्ण ” हें नांव ठेवलेलें ऐकल्यापासून तर त्याला सगळीकडे कृष्णच दिसूं लागला ! जळीं, स्थळीं, काष्ठीं, पाषाणीं सगळीकडे कृष्ण दिसूं लागला. गोकुळांत स्वतः जाऊन कृष्णाला मारून टाकण्याचें धाडस त्याच्यानें करवेना. कारण त्याला पक्के ठाऊक होतें कीं आपण गोकुळांत पाय ठेवला कीं आपलीं शंभर वर्षे पुरीं भरलींच म्हणून समजावीं ! यासाठी आपले मरण जिथवर टळेल तिथवर टाळावे व त्या अवधींत सापाचें पिल्लू मोठें झालें नाहीं तोच त्यास ठेचण्याचा--झाडाचें रोपटें लहान आहे तोंच तें खुडून टाकण्याचा, कृष्णास ठार मारण्याचाहि प्रयत्न आपल्या हस्तकाकरवीं मधून मधून करीत असावा असा त्यांनीं डाव रचला व प्रथम ' पूतना' या नांवाची एक राक्षसीण कृष्णास मारण्यास धाडून दिली.

 पूतनेनें सुंदर व्रजस्त्रीचें रूप धारण केलें व आपल्या स्तनांतून विष भरून ते कृष्णास पाजायला घेण्याच्या निमित्तानें पाजावें म्हणून मोठ्या साळसूदपणानें ती नंदाच्या घरीं यशोदेकडे आली, व “ कसं काय यशोदे ! काय म्हणतो आहे तुझा कान्हा ? फार खेळकर आहेना ? पाहूं बाई एकदा त्याला ! किती पाहिलं व किती घेतलं तरी पुरेंच वाटत नाहीं !" असे म्हणून पटकन् तिनें त्या सर्वज्ञ बालकास उचलून घेतलें. यशोदा आंत कामांत गुंतली होती. तिच्याकडे श्रीकृष्णाच्या श्यामसुंदर मूर्तीस खेळवण्यासाठी दररोज कितीतरी व्रजांगना हौशीनें येत असत. कृष्णकन्हय्याच्या आकर्षक मोहिनीचे पाश एव्हांपासूनच त्यांस खेचून यशोदागृही आणीत होते. अस्तु. तेव्हां त्यांतलीच ही एक असेल असे समजून " हो बाई ! भारीच लबाड झाला आहे. " असे उत्तर देऊन यशोदा पुन्हां आपल्या कामांत मग्न झाली. इकडे पूतनेनें ही संधि बरी आहे असे पाहून हल्केव त्या चिन्मय बालकास पदराखाली घेतले व आपले 'विष कुंभ' असे पयोधर त्याच्या तोंडांत दिले. 'मृत्यू- '