पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १७ ]

धारण केला ? जगताचें पाप क्षालन करतां करतां प्रभु सांवळे झाले काय ? अथवा आपल्या मातापित्याची कोणास शंका येऊं नये म्हणून तर ती सांवळी तनू त्यानी धारण केली नसेलना ? हालाहाल विषपान करून शंकराचा कंठ काळा-निळा झाला. शंकरांनींही ज्याचें चिंतन करावें त्याचा सर्व देहच जगाच्या पापाच्या आगीची धग शांत करतां करता काळा पडावा हे साहजिकच आहे. असो. अशा रीतीनें ' अनामा ' चा नामकरण विधि झाल्यावर म्हाताऱ्या बायाबापड्यांनी त्याजवरून लिंबलोण उतरलें, त्याची दृष्ट काढली, त्याला अंगारे लावले व " इडा पिडा टळो, अमंगळ पळो " असें म्हणून त्यानी आपल्या कानशिलावर बोटें मोडून घेतलीं ! ह्या सर्व अद्भुत प्रकाराचें अर्थात् देवास हंसूं येत होते. पण करतात काय ! मानवी देहाबरोबर मानवी संस्कार व सोहोळेही अनुभवले पाहिजेतच. त्याला उपाय काय ? असो. अशा रीतीनें श्रीकृष्णजन्माचे चार दिवस गोकुळवासीजनांस मोठ्या आनंदांत गेले.

 नंदाच्या घरीं वसुदेवानें आणून ठेवलेल्या रोहिणीस - वसुदेवाच्या दुसऱ्या भायेंस-यापूर्वीच पुत्ररत्न झाले असून त्याचें नांव राम' असें ठेविलें होते. त्यास ' संकर्षण ' असेही म्हणत. रोहिणी आणि यशोदा दोघींनीही आपल्या 'रामकृष्णा' च्या बाल्यावस्थेतील निरुपम प्रेममुख अनुभवलें. " तान्हयां निकें तें माऊलीसीच करणें " अशा अवस्थेंत त्या अनन्यस्तनंधय बालकावर मातेचें--जगांतील यच्चावत् मातेचें-- किती निरुपम प्रेम असतें व त्यांत दैवी कारुण्याची झांक कशी पावलोपावलीं चमकत असते हैं कोणास सांगावयास पाहिजे ? त्यांना न्हाऊ माखूं घालतांना, पाळण्यांत निजवून ' अंगाई गीतें' गातांना, त्यांना कडेवर घेऊन हिंडतांना आपल्या अजातपक्ष पाखरांचे मातांना किती कौतुक वाटतें व त्या हंसऱ्या बालकाकडे तन्मयवृत्तीने पहात असतां मातेच्या स्निग्ध दृष्टींत किती प्रेमळपणा सांठविलेला असतो व जगाच्या मोलाचा हा ठेवा कुठे ठेवूं आणि कुठें नको ठेवूं असें त्यास कसे होऊन जातें याची साक्ष प्रत्येक माता देऊ शकेल. आमच्या यशोदेची तीच अवस्था झाली. हळूहळू भगवान् रांगूं लागले. डाव्या गुडध्यानें गाईच्या गोठ्यांत रांगत जाणाऱ्या त्या कन्हय्याच्या श्यामसुंदर मूर्तीस आवरतां आवरतां तिला पुरेवाढ होई. ‘ रजोमलिन काय ' अशा त्या प्रभूला 'पोटिशीं' धरतांना यशोदेला किती आनंद होत असेल व धन्य वाटत असेल याची कल्पना " धन्यास्तदंगरजसा मलिनी भवंति म्हणगाया दुष्यंताच्या उद्गारावरून वाचकास येईलच. असो. मातेचें स्तनपान कर-