पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ २ ]

हवापाणी ह्यांहीं करून मथुरा सुदर नव्हती काय ? वरवरच्या, ऐहिक, पार्थिव दृष्टीनें पाहिल्यास मथुरा सुंदर असेल. पण सर्व सौंदर्याचा नाश करणारें पारतंत्र्याचें वातावरण त्या सर्वांवर भरून राहिलें होतें. राजा रामचंद्राच्या वेळचा सूर्यवंशीय काळ जाऊन कलियुगप्रारंभाच्या चंद्रवंशय कालास सुरवात होऊन लोभाचें व दुष्टाव्याचे रान तीन ठिकाणीं मुख्यत्वेकरून माजलें होतें. पैकीं दुर्योधनाच्या ' लोभमूळानि पापानि ’ चा भयंकर परिणाम आपण महाभारतांत वाचलाच आहे. तत्पूर्वीचा कंसाचा दुष्टपणा आपणांस आतां पहावयाचा आहे. आपल्या वृद्ध पित्यास - उग्रसेनास - बंदीत घालून त्याचें राज्य बळकावणारा दुरात्मा कंस मॅक्बेथप्रमाणे किंवा अवरंगजेबाप्रमाणे संशयी बनला व पहिला अन्याय पचविण्यासाठी दुसरा व दुसऱ्यासाठी तिसरा अशी पापांची रास त्यानें रचण्यास प्रारंभ केला. त्या पाहिल्यात का तुरुंगाच्या भयाण भिंती ! त्या तुरुंगाच्या तटांच्या भीषण आवारांत ते पहा एक हतभागी दंपत्य आपल्या आयुष्याचे दिवस मोठ्या कष्टानें कंठीत आहे ! हरहर ! “फारचि बरी निरयगति परवशता शत गुणे करी जाच " हे सैरंध्रीला मद्यपात्र घेऊन कीचकाकडे जाण्याचा प्रसंग आला त्यावेळी पंतांनी काढलेले उद्गार अक्षरश: खरे आहेत. गरीब बिचाऱ्या त्या जोडप्यास तुरुंगाचे हाल अपेष्टा भोगावयास लावण्यासारखा त्यांचा अपराध तरी काय होता ? तर त्यांच्या पोटी येणाऱ्या आठव्या मुलाचे हातून त्या मथुरेच्या दुष्ट व पापी राजाचा नाश होणार होता असे त्यास कळले होते आणि म्हणूनच त्या दुष्ट राजानें- कंसानें- वसुदेव-देवकीस- आमच्या अभागी जोडप्यास त्या तुरुंगांत बंदिवान् करून ठेविलें होतें. व त्याच्या मनांत भीषण विचारांचें वादळ सुरू होतें. वास्तविक उग्रसेनाच्या धाकट्या भावाची - देवकाची मुलगी देवकी हिचा पति असणारा वसुदेव कंसाचा मेहुणा होता व देवकी कंसाची चुलत बहीण होतो. पण विधिघटनेच्या दैवदुर्विलासानें हाल भोगणें आज त्यांच्या नशिबीं आलें होतें.

 स्वातंत्र्याच्या वातावरणांतील रम्य देखावे दाखविण्याचे प्रथम आश्वासन देऊन आम्ही प्रथम वरील पारतंत्र्याचा भयाण देखावा वर्णीत आहों हे पाहून वाचक आमच्यावर कदाचित् थोडेसे रुष्ट झाले असतील. पण प्रिय वाचक ! पारतंत्र्यांतलें भयाण चित्र पाहिल्याशिवाय आजवर कोणास स्वातंत्र्याचें रम्य दर्शन झालें आहे ! यासाठीं त्या भात्री स्वातंत्र्याचा आनंद लुटण्यापूर्वी त्याच्या पूर्व तयारीचीं पारतंत्र्यांतली हृदयभेदक दृश्ये आपणांस पाहिलींच पाहिजेत.