पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भगवान् श्रीकृष्ण !
अथवा
( श्रीकृष्णाचें नितांत रम्य चरित्र ! )
भाग पहिला.

 महाभारताच्या अथांग सागरांतून वाचकांस आतां मथुरा, गोकुळ, वृंदावन, द्वारका इत्यादि रम्य प्रदेशांत नेण्याचा आमचा विचार आहे. * यमुना नदीच्या सुरम्य तटार्की असणाऱ्या कुंजवनांत व मधुवनांत मधुकराप्रमाणें गुंजारव करीत वाचकांनी आमच्या पाठोपाठ थावें अशी आमची त्यांस नम्र विज्ञप्ति आहे. महाभारताच्या अथांग सागरांतून ज्या केशवकैवर्तकाच्या साहाय्यानें पांडव ती रणनदी उतरून पार झाले त्या कैवर्तकाचे चरित्र यापुढे गाण्याचे आम्ही योजिलें आहे. त्या काम तो गोपालकृष्ण आम्हांस सहाय्य करो अशी अत्यंत लीनपणे त्याच्या चरणी आमची प्रार्थना आहे.

 चला तर वाचक मथुरेस ! पण हाय ! वरील रम्य प्रदेश पहावयास जाण्यापूर्वी आपणास मथुरेतील एक भीषण देखावा पहाणें भाग आहे ! तो पारतंत्र्यांतला देखावा होता. पारतंत्र्यांतला कोणचा देखावा सुंदर असूं शकेल ? मथुरा सुंदर नव्हती काय ? मधु राक्षसाने वसविलेली मथुरा सुंदर नव्हती काय ? शत्रुघ्नाच्या शूर सेनेनें मधुराक्षसास ठार मारून सुरम्य बनविलेल्या शूरसेन प्रदेशांतील मधुरा कम नीय नव्हती काय ? त्या उंच उंच माड्या व भव्य प्रासाद, जागोजाग असणारे ते बागबगीचे, यमुनेचें तें अर्धवर्तुलाकार पात्र, अमित रत्नांचे ते बाजार, व तें सुंदर* प्रस्तुत चरित्र महाभारतानंतर लिहिले आहे. महाभारतही --" भारतीय संग्राम " ह्या नांवाखालीं- लवकरच वाचकांस सादर करण्याचा आमचा विचार आहे. - ग्रंथकर्ता.