पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[६]

तें जास्तच रम्य केलें आहे. भगवान् श्रीकृष्णाच्या चरित्रांतील गोष्टी ज्या एकदां घडून आलेल्या आहेत, त्या कायमच आहेत. परंतु त्याच गोष्टी प्रस्तुत परिस्थितीला अनुलक्षून मनोवेधकरणानें आणि बोधप्रदपणानें लिहिण्यामध्यें रा. साने यांनीं जें कौशल्य दाखविलें आहे, तें वर्णनीय आहे. पुस्तकाची भाषा प्रौढ आणि प्रेमळ आहे. आणि वर्णनाची शैली मोहक वं भक्तिरसपूर्ण आहे. श्रीकृष्णाचें चरित्र बहुतेक प्रत्येक मराठी कवानें वर्णिलें आहे. आणि त्या प्रत्येक कवीच्या काव्यांतील कितीतरी पद्ये आपल्या समाजामध्यें त्यांच्या प्रेमळपणामुळे सर्व लोकांच्या तोंडीं झालेलीं आहेत. असल्या बहुतेक सुंदर व लोकप्रिय पद्यांचा समावेश रा. साने यांनी आपल्या प्रस्तुतच्या पुस्तकामध्यें ठिकठिकाणी केलेला आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, मुक्तेश्वर, तुकाराम, वामनपंडित, मोरोपंत, मध्वमुनीश्वर, अनंतफंदी, वगैरे अनेक उत्कृष्ट कवींचे कृष्णचरित्रपर, भक्तिपर किंवा वेदांतपर असे कितीतरी उत्कृष्ट वेंचे रा. साने यांनीं आपल्या पुस्तकांत निरनिराळे प्रसंग साधून ग्रथित केले आहेत. व त्यामुळे एकंदर पुस्तकामध्यें भक्तिरस आणि प्रेमळपणा यांचा परिपोष फार परिणामकारक झाला आहे. क्वचित् प्रसंगीं तर हे वेंचे इतक झालेले आहेत कीं, सरसतेच्या दृष्टीनें त्यांची संख्या जरूरीपेक्षां कधीं कधीं ज्यास्त झाल्यामुळे हे पुस्तक गद्यमय असूनही जणूंकाय पद्यमयच आहे, असा अतिरेकाचा भास उत्पन्न होतो. तरीपण या प्रेमळ कवींच्या प्रेमळ वचनांची प्रेमळ भर प्रस्तुतच्या चरित्रामध्ये पडल्यामुळे एकंदरीमध्यें भक्तीचा, करुणरसाचा आणि वात्सल्याचा उत्कर्ष उत्तम साधला आहे, यांत शंका नाहीं.

स्वराज्य ऑफिस, २१।१।२३.} शि. म. परांजपे.