पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हृदयनिवेदन !  अहाहा ! वाचक, आजचा आनंदाचा आणि भाग्याचा दिवस त्या प्रेमळ प्रभूनी आम्हांस दाखविला याबद्दल आम्ही त्या मंगलमयाचे सदैव ऋणी आहोत. आणि ही आमची कृतज्ञता त्याच्याच कृपेनें तयार झालेलें प्रस्तुत पुस्तक त्याचेच चरणी अर्पण करून ही वाग्वैजयंती त्याचेच गळां घालून आम्ही व्यक्त करीत आहों, ती तो गोड करून घेवो, एवढीच आमची त्या दीनदयाळ भक्तवत्सल परमेश्वराजवळ प्रार्थना आहे !

 वास्तविक " माझा मराठाचि बोल निके । परी अमृता तेंहि पैजा जिंके " अशा तोडीचे बोल बोलण्याची कां माझी योग्यता ? पण त्याची कृपा असल्यावर रंकावरतीहि चवऱ्या उडूं लागतात, आणि मुकेही बृहस्पतीसारखे बोलूं लागतात. यासाठी आमचा जणों हात धरून ज्या प्रेमळ गोपाळानें प्रस्तुत चरित्र आमच्याकडून लिहविलें त्याच्याविषयीं वाटणारें कृतज्ञतेचें प्रेम आणि उमाळा कोणच्या शब्दांत व्यक्त करावा हेच आम्हांस समजत नाही. तेव्हां वारंवार हें मस्तक त्याचे चरणावर ठेवून सगद्गद कंठानें भगवन्, अशीच ह्या रंकाची सदैव आठवण ठेवा " अशी त्या दयाघनाजवळ प्रार्थना करून भक्तिप्रेमाचे अश्रू टप् टप् गाळणें यावांचून आम्ही दुसरे काय करणार ?

 प्रस्तुत चरित्राचे लेखन सुरू असतां आमचे प्रेमळ रसिक वडील बंधु ती.त्रिंबकराव यांनी वारंवार ते वाचून पाहून आम्हांस जो अपूर्व उत्साह दिला व आमचे मित्र रा. भिंगे यांनी आम्हांस ज्या बिनमोल उपयुक्त सूचना दिल्या त्यांबद्दल आम्ही दोघांचेही अत्यंत ऋणी आहात. तसेच प्रस्तुत पुस्तकास कथानकाच्या दृष्टीनें मुख्यत्वेंकरून ज्यांच्या " श्रीकृष्णचरित्रा चा आम्हांस बिनमोल उपयोग झाला त्या रा. ब. चिंतामणराव वैद्यांचही आम्ही