पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्लास्गो व हायलंडस्... यांच्यामध्ये बायकांची दाटी झाली होती. पुरुष मंडळी सुद्धा आझांला निदान ओझरते पाहण्यासाठी रस्त्यांत उभी राहिली होती. तेथील सर्वांत वृद्ध माणसाच्या देखील आठवणींत, कोणी हिंदी सरदार सहकुटुंब त्या स्थळी पूर्वी कधी आले नव्हते, असे त्याचे ह्मणणे होते. अशा बाबतींत ते तेथे अर्थातच वेदवाक्यतुल्य समजले जावयाचे. स्कॉटलंड मध्ये पुष्कळच सरोवरे आहेत. त्या सर्वांमध्ये लॉक ऑ हे फार मोठे, चित्रासारखें सुरेख, व प्रेक्षणीय आहे. त्याची लांबी तेरा मैल असून, रुंदी कचित् स्थळींच पाऊण मैलावर आहे. त्याच्या चौफेर भव्य पर्वतांचा गराडा आहे. त्या. पर्वतांमध्ये बेन् क्रुशाँन् हा सर्वात उंच-३६८९ फूट-आहे.. या सरोवरामध्ये जागजागी लहान लहान व सुंदर बेटे आहेत. दोन्ही टोकाला आगगाडी व टप्प्याच्या गाड्या चालतात. त्या सरोवरांत आगबोटी चालतात त्यांतून मजेदार व मनोहर सफर, करितां येते. पाण्याचा पृष्ठभाग स्वच्छ व संथ असतो. त्याच्यावरून सरपटत जातांना, दुतर्फा या देशांतील अत्युत्तम प्रेक्षणीय व रमणीय वनश्री, अप्रतिम हिरवीगार कुरणे, त्यांच्यांतील गगनचुंबी शोभायमान वृक्षराजी, इत्यादिकांमुळे मनोरम वाटणारे दोन्हीकडचे प्रांतभाग, दृष्टीस पडतात. हा देखावा चांगलाच मनोवेधक आहे. तरी पण, त्याला हिंदुस्थानांतल्या बऱ्याच ठिकाणच्या उज्ज्वल सृष्टिसौंदर्याची सर क्वचितच येते. २१५