पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ब्रिस्टल शहर आणि तेथील राजाश्रित प्रदर्शन. अमोल संधी मला त्या दिवशी अवचित मिळाली. या देखाव्यासंबंधाने मी पुष्कळचसें ऐकिलें होतें. तो प्रत्यक्ष पाहण्याची मला भारी इच्छा होती. लंडनमध्ये मी तो पाहिला होता. पण तो या वेळी पाहण्यांत आला त्या मानाने, कांहींच नव्हता. गाडी बाथहून सुटली त्यावेळी अस्तोन्मुख सूर्याच्या प्रभेनें तें सारें शहर सुस्नात होऊन, त्या देखाव्याला नवीनच सौंदर्य आले होते. आकाशांत विलक्षण वर्णवैचित्र्याच्या रेखांचा समुदाय दिसत होता. त्याचे यथार्थ वर्णन किंवा चित्र, अप्रतिम लेखक अथवा कुशलतम चित्रकार, यांच्या शब्दांनी किंवा कलमाने, पुर्तेपणी होणे शक्य नव्हते. रसरसित प्रभेच्या योगानें सारें आकाश जणों तुडुंब भरलेल्या दीप्तिमान् सागरासारखें भासत होते. तथापि हा संधिप्रकाशाचा देखावा हिंदुस्थानांत जो वारंवार दृष्टीस पडतो तितका भपकेदार नव्हता. घरेदारें व आसमंद्भात् भाग, अधिकाधिक अस्पष्टसे होऊ लागले. तरी एक त-हेचा प्रकाश अवशिष्ट होता. अखेर तोही रात्रीच्या काळोखामध्ये लुप्त होऊन गेला. तो देखावा प्रशांत रमणीय वाटला. पुढे तोही बदलला व रजतकुंभसम रजनीकर नीलवर्ण गगनांतरांत उदयास आला. त्याचा फिक्कट प्रकाश टेंकड्यांवर व दऱ्याखोऱ्यांमध्ये पसरला. त्यावेळी तो देखावा जास्तच सुंदर व शोभायमान दिसू लागला.