Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४०
उपसंहार.

भोगण्याची पात्रता राहिली नाहीं; जीवन-कलहाच्या दामटींत सांपडून मनुष्य- त्वाचीच दामटी होऊन गेली आहे; श्रम करून शरीरसंपत्तीची दाणादाण केली, तरी संसारांतली ताणाताण रतिमात्रही कमी होत नाहीं; क्वचित् कुठें तेजस्विता असली तरी घरांत दाणा नाहीं, रात्रंदिवस 'आणा ' संपत नाहीं; अशा स्थितीत बाणा तरी कसला मिरवावयाचा ! एका बाजूनें भिन्नप्रकृति राजसत्ता, घातुक शासनपद्धति, ठेंचून टाकणारें शिक्षण, उल्हास पावणारें दारिद्र्य, यमकिंकराचें अप्रतिहत प्रावल्य, संभावितपणाचे सोंगांत ऐटीने मिर- विणारें इरसाल दौर्बल्य; अनेक प्रकारच्या कायद्यांनी चहूंकडून जखडून टाक ल्यामुळे कसल्याही उद्योगधंद्याचा गर्भ धरण्यास असमर्थ झालेली प्रसववंध्या राष्ट्रलक्ष्मी, कमालीची स्वार्थपरायणता, संकुचितपणाची पराकाष्ठा, कान धरून हलविले तरीही न उघडणारी काळझोंप ' मला नाही तर नाहीं, पण तुला तरी घेऊं देणार नाही,' असला अमानुष नीचपणा, पारतंत्र्यांत मुरलेली श्वानवृत्ती, भूषण वाटणारा गळेकापूपणा; जातीजातींचा द्वेष, स्वजनांचा मत्सर, दया, प्रेम वगैरे कोमल मनोवृत्तींचा अभाव; आणि दुसऱ्या बाजूने व्यक्तिस्वातंत्र्याच्या नांवानें मिरविणारा उल्लूपणा, व्यासंग आणि उद्योग यांचें कार्पण्य, नाना प्रकारचीं परकीय विलोभनें, विझणान्या ज्योतीप्रमाणे क्षणमात्र उत्तेजित करून काय- मचे निर्वीर्य करणारें उद्दीपक साहित्य, कल्पनेचा पाट अनिर्बंध फोडून देऊन मनोदीर्वव्याचें पीक पिकविणारें भ्रामक वाजाय, वाक्शक्तीचा खाऊ हातावर घेऊन क्रियाशक्तीचें भूषण न कळत हरविणारे वर्तमानपत्नी विद्यार्थी, इतिहास- संशोधनाच्या अगर सत्यप्रियतेच्या नांवाने होणारे विषारी ग्रंथलेखन, देश- कालानें उत्पन्न केलेल्या फराळांची दुकानें, नाट्यमंदिरें वगैरे सारख्या संस्था, सुखोपभोगाची मोहक व सुलभ साधनें, पाश्चात्य व्यापारानें व संस्कृतीने निर्माण केलेला हा मायेचा बाजार, पाण्याची भूमी व भूमीचें पाणी भासविण्याची मयासुरी कला अवगत असलेली पाश्चात्य सरस्वती, आणि पूर्वी सांगितल्या- प्रमाणें ' यस्य कस्य तरोर्मूलं' असल्या खंडपंडितांनी बेजबाबदारपणानें केलेले निरर्गल प्रलाप, अफाट ध्येयें, अचाट कल्पना, अनिवार सभा, बेजार फंड, आणि असल्या खाणींत उत्पन्न झालेला ' यद्वा तद्वा' मानववंश;-यांच्या दुहेरी मान्यांत सांपडून वैदिक धर्म, वैदिक संस्कृति, आणि महाराष्ट्र यांची राख- रांगोळी होण्याची वेळ आली आहे !!