पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाल्य. दीड दोन तास चालावयाचा. यावेळी ते येवढा आरडाओरडा व धामधूम करीत कीं सारें घर त्रासून जाई. शेवटी भाऊसाहेबांस त्रास होऊं नये म्हणून, त्यांच्या आईने समोरच्या बोळांतलें घर मुद्दाम घेतलें, आणि पुढें स्नानादिक विधी तेथें होऊं लागले. असे त्यांना जरा समजूं लागेपर्यंत चाललें होतें. देवाच्या अंगाऱ्याचें वेड तर पुढे पुढे इतके वाढलें कीं, त्याखेरीज त्यांचें जेवणच होत नसे. लहान पोरांना आपण कडेवर घेऊन काऊचिऊ करीतों, अथवा 'हा अमक्याचा ' 'हा तमक्याचा' असे घांस देऊन जेऊं घालतों, त्याप्रमाणे, एक राखेचा पसा पुढे ठेवून प्रत्येक घांसाला राख लावून देव्हाऱ्यांतल्या एकाद्या देवाचें नांव जेव्हां आईंने घ्यावें, तेव्हां कुठे बाळाचें खाणें व्हावें ! त्याची वडील बहीण त्यांना नेहमीं म्हणत असे कीं, 'कोण जोगडा आला आहे जन्माला कोण जाणे ! ' कोणच्याही गोष्टींत थोडेपणा त्यांना कधींच खपला नाहीं. लहानपणीं देखील असेच होतें. त्यांच्याकरतां वेगळ्या बोटकुलीत भात करून ती तांबला त्यांच्यासमोर सगळीच्या सगळी पालथी करावी लागे ! जर कां एकाद्या दिवशी यांत हयगय झाली, तर आकाश-पाताळांतल्या साऱ्या देवता गलबलून जातात की काय एवढा गोंधळ व्हावयाचा म्हणून समजावें ! अखेरीस कंटाळून ज्यावेळी आई मोठें थोरले भाताचें भांडें त्यांच्यापुढें परातीत पालथें घाली, तेव्हां कुठें हें गोंधळदेव तृप्त व्हावयाचे; आणि प्रसन्नतेनें त्यांतून दोन चार घांस आपल्या कोवळ्या केळफणीसारख्या नाजुक बोटांनी उचलून घ्यावयाचे ! एरव्हीं कोणत्याही रीतीनें समजूत होणें शक्यच नसे ! मूळव्याधीचा त्रास त्यांना सहाव्या महिन्यापासूनच होता. शौचाचे वेळेस सबंध अंग बाहेर पडत असे, व मग तें हळू हळू परत आंत जाईपर्यंत मोठा त्रास होई. मुक्ता म्हणून त्यांचेकडे जुनी कुळंबीण होती. तिच्या अंगावर श्रीअण्णासाहेत्र लहानपणापासून होते. तिनें त्यांना पायांवर घ्यावें व हळूं हळूं युक्तीनें तें आंत घालावें. यामुळे त्यांना शौचास वेळ लागणे, शौचाचे वेळीं त्रास होणे, रक्त पडणें वगैरे ज्या कांहीं संवयी लागल्या त्या शेवटपर्यंत तशाच होत्या. शौचास त्यांना कमीत कमी पाऊण तास लागे. शौचाचे वेळीं त्रास व मधून मधून रक्त पडणें, हें तर नित्याचेंच होतें. अशी रक्तस्रावाची नित्य संवय असतां, त्यांची प्रकृति अखेरपर्यंत ताब्यांत व कार्यक्षम राहिलेली पाहून आचंबा वाटतो.