पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुखाचें खरें साधन.
आर्या.

जन ह्मणती सुख सुख सुख तें शांतीहूनि दूसरें नाहीं
करितां विचार कळले मज त्यांत नसेची संशयो कांही. १
धन राज्य कीर्ति यांहीं येते जी शांति मानसा तीतें
सौख्य असें ह्मणति जनीं खोटें किंवा खरें पुस मतीतें. २.
पण धनराज्यादिक ही क्षणभंगुर असति ह्मणुनि सुख त्यांचें
वाटे अशाश्वत नसे यांत नवल तें खरोखरी साचें. ३
तर मग अविनाशी सुख मिळेल कैसें असें मना वाटे
नानाविध युक्तींहीं भांबावुनि चित्त बापुडें दाटे. ४
त्याचें उत्तर एकचि आहे तें साधुनीं जना कथिलें
तें सकलींही शास्त्री निःसंशय चांगले असे मथिलें. ५
तें उत्तर ऐकावें चित्त करुनि शांत सांगतों येथे
शंका यांत धराया जागा तिळमात्रही नसे तेथें. ६
निज चित्त शुद्ध ठेवुनि निजकर्तव्य अखंड जागावें
परहित करितां करितां कायावाचामनेंहि भागावें. ७
हेतु विशुद्ध धरोनी खरचनियां सकल शक्ति साधाया
कार्या यत्ना करणें न शके यमही तयास बाधाया. ८
उद्योगावर दृष्टी ठेवावी किमपिही कधी न फलीं
पेरावें तेंचि खचित उगवेल अशीच सृष्ट रीति भली. ९
होवो यत्न सफल वा निष्फल त्याची करूं नये परवा
चांगलिया उद्योगा यश येतें भरंवसा असो बरवा. १०
वाहोनि काळजीतें भवितव्यीं किमपि अंतर पडेना
मग कां व्यर्थ वहावें ओझें सुख जें कधीं हि लव देना. ११.
ठेवोनि भाव देवीं खदुःखा न गणितां सदाचरण
करणें स्वस्थ रहाणें हेंच धरेवर खरें समुद्धरण. १२
दृढ निश्चयें निरंतर ऐसे वर्तन जनामधिं करावें
तेणें भवसिंधूतं शांतिमुखातें वरोनिच तरावें. १३