पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


यींची रसिकता गोडबोल्यांपासून मोडकांस प्राप्त झाली.आणि बाकीच्या मंडळीस ती रसिकता नाहीं, ह्याचें कारण त्यांस अशा प्रकारचें साहचर्य नाहीं, हें होय. ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे.

 जनार्दनपंत इ० स० १८७१ ह्या वर्षी नाशिक हैस्कुलामध्यें फर्स्ट असिस्टंट मास्तर झाले. पुढे कांहीं दिवस ते रत्नागिरी जिल्ह्याचे डेपुटी एजुकेशनल इनस्पेक्टर होते. नंतर इ० स० १८८२ ह्या वर्षी त्यांस ठाण्याच्या हैस्कुलाचे हेडमास्तर नेमिलें. मध्यंतरी इ० स० १८८५ ह्या वर्षी त्यांस धुळ्याच्या हैस्कुलावर हेडमास्तर नेमिलें होतें. परंतु पुनः इ० स० १८८६ ह्या वर्षी ते परत आपल्या ठाण्याच्या जागेवर आले. ते शेवटपर्यंत तेथें होते.

 जनार्दनपंत उत्तम शिक्षक होते. आणखी, कोणतेंही काम हाती घेतलें ह्मणजे तें अगदी मनापासून, जीवेंभावें करावयाचें – त्यांत तिळमात्र कसूर करावयाची नाहीं-असा त्यांचा अंगस्वभाव होता; तेणेंकरून, मुलांस शिकविणें काय, शाळेचे कागदपत्र चोख ठेवणें काय, आणि सगळी कामें वेळच्यावेळेस करणें काय, त्यांत तिळभरही अंतर पडत नसे. कोणाकडून पत्र आलें कीं त्याचें उत्तर लागलेंच द्यावयाचें; आजचें काम उद्यांवर टाकावयाचें नाहीं; आणि कामांत कधीं व्यंग राहू द्यावयाचें नाहीं; अशी त्यांची वृत्ति होती. तिच्या योगानें त्यांची सगळी कामें पाहावीं तेव्हां अगदी तयार असत. तें पाहून त्यांचे अधिकारी त्यांवर नेहमीं संतुष्ट असत.

 शाळेतल्या मुलांस स्वतःच्या मुलांप्रमाणे वागवावयाचें, आणि असिस्टंट मास्तरांस धाकट्या भावांप्रमाणे वागवावयाचें,