पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


वेगळ्या स्थितीस वेगळी वेगळीं भूषणें काय असतील ती असोत; परंतु, त्या सर्व भूषणांस भूषण सच्छील हें आहे ह्मणजे, इतर भूषणांस शोभा येण्यास सच्छील हें आवश्यक आहे. किंबहुना, सौभाग्यवती स्त्रीच्या इतर सर्व भूषणांस भूषण कुंकूं आहे, तसा कांहीं प्रकार इतर गुण आणि सुशीलता ह्यांचा दिसतो. असें सच्छील आमचे मित्र जनार्दन बाळाजी मोडक ह्यांचे ठायीं होतें. आणि ते नुकते परवां अकस्मात परलोकवासी झाले आहेत. तेव्हां त्यांचें चरित्र अवलोकनीय आहे हें उघड आहे. तें आह्मी येथें सादर करितों.

 जनार्दनपंतांचे वडील बळवंतराव मोडक, हे मूळचे पंचनदीचे राहाणारे. ते निर्वाहाच्या उद्योगाकरितां पुण्यास येऊन राहिले होते. त्यांचे चिरंजीव जनार्दनपंत हे इ०स० १८४५ च्या अखेरीस जन्मले. त्यांनी इंग्रजी विद्याभ्यास पुण्याच्या हैस्कुलांत केला. तेथें त्यांची प्रवेशपरीक्षा उतरल्यावर ते पुर्णेपाठशाळेंत जाऊं लागले. आणि त्यांनी आपल्या अभ्यासाचा सगळा खर्च, पगारी विद्यार्थ्यांच्या जागा आणि बक्षिसं मिळवून, आपण स्वत चालविला. ह्मणजे विद्याभ्यासाच्या खर्चाचें ओझें त्यांन आपल्या वडील माणसांवर पडूं दिलें नाहीं. ते इ० स० १८७० ह्या वर्षी बी. ए. झाले.

 सगळ्या पदवीधर आधुनिक मंडळीमध्ये महाराष्ट्र काव्याची रुचि आणि अभिमान ही जनार्दनपंतांस फार होतीं. ह्यास कारण कै. वा. परशुरामपंत तात्या गोडबोले, ह्यांचा सहवास होय. पुण्यास ते आणि हे अगदी जवळ जवळ राहात असत. तेव्हां, साहचर्यानें, महाराष्ट्र काव्यांविष-