पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७

उच्च ध्वनि निघतो. तार जितकी जास्त आंखूड असते, तितका तिचा सूर जास्त उच्च व कर्कश असतो; कारण लांब तारेपेक्षां आंखूड तारेचा कंप जास्त जलदी होतो. सनई, अलगुज वगैरे फुंकून वाजवावयाच्या सर्व वाद्यांत हेवेचे अशा प्रकारचे भिन्नभिन्न कंप होण्याची योजना केलेली असते. मनुष्याच्या घशाच्या मागच्या बाजूस, हवा वाहिल्यानें ज्यांचे कंप अनेक प्रकारचे होतात असे स्नायु बसविलेले आहेत; त्यांच्या योगानें माणसास हवा तो सूर काढितां येतो.

 ध्वनि ह्मणजे काय याची सामान्य माहिती वर सांगितली; आतां, एकदां केलेले भाषण, किंवा एकदां गाइले गाणें, किंवा एकदां उत्पन्न झालेला कोणताहि आवाज "लिहून" ठेवणारें, व तो आवाज, तें गाणे किंवा तें भाषण पुनः पाहिजे त्या वेळीं व पाहिजे तितके वेळां बोलून किंवा गाऊन दाखविणारें असें जें एक चमत्कारिक यंत्र अमेरिकेंतले प्रसिद्ध यंत्रविद्याप्रवीण एडिसन ह्यांनी तयार केलें आहे, त्याची माहिती सांगतों.

 आपल्या कानावर हवेचे तरंग आदळल्यानें आपणास ध्वनीचा भास होतो असें जर खरें आहे, तर, कोणताही शब्द उच्चारतांना किंवा कोणतेंही गाणें गातांना हवेंत ज्या प्रकारचे तरंग उठतात, त्याच प्रकारचे अगदी हुबेहूब तरंग जर हवेंत पुनः कोणत्या तरी उपायानें उत्पन्न करितां आले, तर, तेच शब्द व तेंच गाणें पुनः ऐकू येईल हे उघड आहे. आणि हेंच धोरण धरून मि. एडिसन यांनी आपलें यंत्र तयार केलें आहे. त्यास फोनोग्राफ ह्मणतात. ह्या यंत्रांत अत्यंत नाजूक कांचेचा एक वाटोळा पडदा असतो. त्या पडद्यासमोर बोललें ह्मणजे हवेंत उत्पन्न झालेले तरंग त्यावर आदळून४