पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तो मागेपुढे हालूं लागतो. एकाद्या भांड्याजवळ आपण मोठ्यानें बोललों ह्मणजे त्याला कंप सुटून त्यांतून बारीक आवाज निघूं लागतो, हें पुष्कळांनी पाहिलेंच असेल; त्याचप्रमाणें त्या कांचेच्या पडद्याचें होतें. बोलणाराच्या उच्चनीच स्वरांच्या मानानें तो पडदा कमजास्त मागेपुढे जाऊं येऊं लागला ह्मणजे, त्या पडद्याच्या मागच्या बाजूस एक सुई चिकटविलेली असते, तीही त्या पडद्याबरोबर मार्गेपुढे होऊं लागते. ह्या सुईच्या अग्रास लागून एक मेणाचा रूळ ठेविलेला असतो; आणि ती सुई मागें-पुढे होऊं लागली कीं त्या मेणावर तिच्या अग्रानें कम-जास्त खोल अशीं सूक्ष्म भोंकें पडूं लागतात. आणि तो रूळ फिरत असल्यामुळे तीं भोंकें रांगेनें पडतात. आतां समजा कीं, आपण त्या कांचेच्या पडद्यापुढे कांहीं शब्द बोललों, आणि आपल्या उच्चनीच स्वरांप्रमाणें कमजास्त खोल अशा भोंकांची रांग त्या मेणाच्या रुळावर पडली; नंतर, तीं भोंकें पडण्यास जेथें आरंभ झाला असेल, तेथें ती सुई पुनः परत आणून ठेवून, तो रूळ पुनः फिरविण्यास आपण आरंभ केला; तर भोंक जेथें जास्त खोल असेल, तेथें ती सुई जास्त खालीं जाईल, आणि जेथें उथळ भोंक असेल तेथें वर येईल – ह्मणजे त्या भोंकांच्या कमजास्त खोली- प्रमाणें ती सुई उड्या मारूं लागेल – तिला कंप सुटेल- हैं उघड आहे. त्या सुईला कंप सुटल्याबरोबर तिच्या वरच्या कांचेच्या पडद्यासही कंप सुटेल, आणि त्यास लागून असलेली हवा,आपण पहिल्यानें बोलल्याप्रमाणें,हुबेहूब कांपूं लागेल. आणि आपला कान जवळ अस-ल्यास आपले शब्द आपणास पुनः ऐकूं येतील.