पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०


यामुळे त्यांस हिंदुस्थानाच्या राज्यकारभाराची माहिती बरीच झालेली आहे. शिवाय, ह्यांचे पितामह, जनरल हारिस, हे हिंदुस्थानांतल्या सैन्यांत मोठे अमलदार होते. त्यांनींच इ० स० १७९९ ह्या वर्षी श्रीरंगपट्टणचा किल्ला घेतला. शिवाय, ह्या आमच्या नव्या गव्हरनर साहेबांचे वडील मद्रासचे गव्हरनर होते. ह्मणजे, हिंदुस्थानांत मोठें काम करण्याची ही त्यांची तिसरी पिढी आहे. आणखी, ते इकडे येतांना विलायतेस एकदां सर्भेत असें ह्मणाले की, "मला लहानपणापासून हिंदुस्थान ठाऊक आहे, आणि त्याविषयीं मी पुष्कळ गोष्टी ऐकत आलों आहें. माझ्या वाडवडिलांस हिंदुस्थानापासून पुष्कळं लाभ झाले आहेत, हें मला ठाऊक आहे, आणि तत्संबंधी मला हिंदुस्थानाचें उतराई व्हावयाचें आहे मला हिंदुस्थानाचें ऋण फेडावयाचें आहे हे मी कधीं विसरणार नाहीं." हे शब्द निरंतर स्मरणांत ठेवून लार्ड हारिस ह्यांनीं जर मुंबईच्या गव्हरनराचें काम केलें, तर, इंग्लंडाच्या औदार्याच्या कीर्तीस भर पडावी, आणि हिंदुस्थानाचें कल्याण व्हावें, अशी कृत्यें त्यांचे हातून खचीत खचीत घडतील. परमेश्वर करो, आणि तीं तशीं घडोत.

उभयतां थोर पुरुषांचें कल्याण परमेश्वरापाशीं मागून आह्मी हा लेख येथें समाप्त करितों.


स्वर्गवासी मित्रांस प्रार्थना.
साक्या.

होता आह्मांवरी अपरिमित लोभ तूमचा साचा
त्याचें वर्णन पूर्ण कराया गुरुहि न शकावयाचा.१.