पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८


खपावयाचें नाहीं. आणि मनुष्य सत्याचरणी झाला ह्मणजे त्याचे ठायीं बाकीचे सद्गुण आपोआप यावयाचे. आणखी, लार्ड रे ह्यांस सत्याची आवड फार आहे. त्यांनीं परवां जातां जातां पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कुलाला एक आपल्या नांवाचें दरसाल बक्षीस मिळावें अशी तजवीज करून ठेविली आहे. आणि तें बक्षीस, खरें बोलणाऱ्या सुशील हुशार विद्यार्थ्यास द्यावें, अशी अट घातली आहे. ही चांगली आहे.

 लार्ड रे ह्यांच्या कारकीर्दीतल्या एकदोन गोष्टी शिवायकरून बाकी सर्व गोष्टी लोकमान्य झाल्या आहेत. लोकशिक्षणाचा भार म्युनिसिपालिट्यांच्या व लोकांच्या आंगावर पडूं लागला हें चांगलें झालें नाहीं; आणि मुंबईच्या विश्वविद्यालयाच्या रचनेंत सुधारणा करण्याच्या कायद्याच्या मसुद्यास मार्गे टाकून दिलें ही गोष्ट अप्रिय झाली आहे. बाकी, विशेष दोष देण्यासारखें ह्यांच्या कारकीर्दीत कांहीं झालें नाहीं.

 लार्ड रे हे मोठे मेहेनती आणि स्वकर्तव्यदक्ष आहेत. त्यांनी आपल्या निर्भीड व सरळ आचरणानें आपल्या राष्ट्रास भूषण आणिलें आहे आणि आह्मां लोकांस उत्तम कित्ता दाखविला आहे. ह्मणून ह्यांचे फार फार आभार मानून, आह्मी परमेश्वरापाशीं असें मागतों कीं, ह्या थोर पुरुपाचें निरंतर कल्याण होवो. ह्याहून दुसऱ्या कोणत्या प्रकारें आह्मीं ह्यांचे उतराई व्हावें ?

 लार्ड रे ह्यांनीं राज्य चालविण्यांत जशी दक्षता दाखविली, तशीच दक्षता त्यांच्या पत्नी लेडी रे ह्यांनीं एतद्देशीय स्त्रियांस साहाय्य करण्यांत दाखविली. त्यावरून त्यांचेंही नांव आमच्या लोकांत चिरकाल राहील.