पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६

नाहीं. तथापि, वियोगदुःख आणि आगमनानंद ह्यांच्या अल्प छाया मनांत आल्यावांचून राहत नाहींत. तसा प्रसंग सध्यांचा आहे असें नाहीं; तर त्याहून अधिक योग्यतेचा आहे. लार्ड रे आपले काम सोडून निघून गेले, आणि त्यांच्या जागेवर लार्ड हारिस आले, हे सगळें राज्यनियमांप्रमाणें झालें. परंतु, हा वियोगसंयोग जीवंतांशीं, थोर मनुष्यांशी, आणि आमच्या लोकांचें हिताहित हातीं आहे अशा माणसांशी झाला. तेव्हां त्यासंबंधानें विशेष विचार मनांत येणें हें साहजिक आहे. ह्मणून ह्या उभयतां थोर गृहस्थांचें संक्षिप्त चरित्र येथें सांगतों.

 आधीं प्रथम लार्ड रे ह्यांचें वृत्त सांगतों. हे गृहस्थ इ० स० १८३९ ह्या वर्षी जन्मले. हे मोठे भाषाभिज्ञ आहेत. लोकशिक्षण हा ह्यांचा आवडता विषय आहे. इंग्लंडांत ह्यांची गणना नामांकित विद्वानांत आहे. तसेच हे मोठे वक्ते आहेत. हे इ० स० १८८५ च्या मार्च महिन्यांत मुंबईच्या गव्हरनराच्या कामावर आले. ह्यांच्या कारकीर्दीत ह्या इलाख्यांत कितीएक मोठमोठ्या गोष्टी घडल्या. त्यांत तीन मुख्य दिसतात. पहिली ही कीं, धंदेशिक्षणास चांगला आरंभ झाला; येथील व्हिक्टोरिआ टेक्निकल इन्स्टिट्यूट, चित्रशाळेजवळची रे उद्योगशाळा, पशुवैद्यकाची शाळा, पास्तूरप्रयोगालय, पुण्याचें पदार्थसंग्रहालय वगैरे चांगल्या संस्था चालू झाल्या, आणि ग्रांट मेडिकल कालेजांत शिक्षकांची व डाक्टरांची चांगली योजना होऊन वैद्यकीचें शिक्षण अधिक चांगलें होऊं लागले. दुसरी गोष्ट ही कीं, कायदेकौंसलामध्यें नेमणुका उत्तम प्रका -