सर दिनशा माणकजी पेटिट ह्यांस त्यांच्या औदार्याच्या गौरवार्थ सरकारानें ब्यारोनेट ही पदवी दिली आहे. ही वंशपरंपरा चालेल. सगळ्या हिंदुस्थानांत ब्यारोनेट पदवीस चढलेले दोनच गृहस्थ आहेत; ते ‘दोघेही पार्शी आहेत. हें पार्शी लोकांस भूषणावह आहे.
लार्ड क्रास ह्यांचें हिंदुस्थानच्या कायदेकौन्सिलांसंबंधाचें बिल लार्डसभेत पसार झालें. कौन्सिलांसंबंधानें राष्ट्रीय सभेची जी मुख्य मागणी आहे, ती त्यांत मुळींच गाळली आहे. ह्मणून, तें बिल कामन्ससभेत नामंजूर व्हावें अशाविषयीं इकडच्या लोकांनी अर्ज वगैरे करून प्रयत्न केला पाहिजे.
न्यूयार्कमधल्या एका वर्तमानपत्राच्या मनांत एका तुरुंगाच्या अव्यवस्थेबद्दल शोध करावयाचा होता. ह्मणून त्यानें आपल्या एका बातमी-दारावर खोटा आरोप आणवून त्यास त्या तुरुंगांत गुजरविलें; तो बातमीदार आतां सुटल्यावर त्या तुरंगांतील अव्यवस्थेची हकीकत सांगत आहे.
सर मंगळदास नथूभाई हे गेल्या महिन्याच्या ७ व्या तारिखेस मरण पावले. त्यांनी आपल्या मृत्युपत्रांत सुमारें सात लाख रुपये धर्मार्थ कृत्याकरितां काढून ठेविले आहेत. कनिष्ठ मुलाशीं त्यांचा जो वाद चालला होता, त्याच्या पायीं त्यांस नऊ लाख ब्याण्णव हजार रुपये खर्च आला.
हिंदुस्थानांतील राजेरजवाड्यांच्या मुलांकरितां एक लष्करी शिक्षणाची शाळा असावी ह्या सूचनेस डयूक आफ् कनाट यांचें अनुमोदन असावें ह्मणून दक्षिणमहाराष्ट्रांतील कांहीं संस्थानिकांचें वगैरे डेप्युटेशन ड्यूक आफ् कनाट यांकडे गेलें होतें. या कामास त्यांनीं आपलें अनुमोदन दिलें; परंतु त्यास हिंदुस्थानसरकारची संमति पाहिजे असें ते म्हणाले.
मि. एडिसन यांचें ध्वनिलेखक ( फोनोग्राफ ) यंत्र चांगलें पक्क झालें आहे. त्यांत बोललेलें भाषण किंवा गाइलेले गाणें पुन: हवें तितक्या वेळां ऐकतां येतें. आतां याच यंत्राच्या संबंधानें त्यांनीं एक फोटोग्राफचें यंत्र केलें आहे. त्यांत, मनुष्य बोलत असतांना त्याच्या मुखविक्षेपांचे फोटोग्राफ अत्यंत जलदीनें काढिले जातात, आणि मग, या मनुष्याचें बोलणें त्या यंत्रांतून पुन: ऐकतांना ते फोटोग्राफ एकामागून एक ऐकणाराच्या दृष्टीसमोरून इतक्या वेगानें जातात कीं, तो मनुष्य बोलत आहे असा दिसतो.