पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२


विध्वंस होतो. लोहचुंबकास लोखंड ओढितां येतें; ह्मणून त्याचा धर्म चुंबन ही शक्ति होय.

 उष्णतेच्या योगानें पायाचें व दुसऱ्या पदार्थोचें प्रसरण होतें; तें प्रमाणभूत धरून, उष्णतामापक यंत्राच्या द्वारें, शास्त्रीय प्रयोगांमध्यें उष्णता मापतात. त्याप्रमाणें, वेगवेगळ्या शक्तींची तुलना करण्यासाठीं, शक्तीचा कोणता तरी एक परिणाम प्रमाण धरून, त्यावरून त्यांचें माप ध्यावें लागतें. एक पौंड वजन एक फूट उचलण्यास जी शक्ति लागते, त्या शक्तीस प्रमाणमाप धरून, त्यावरून सर्व शक्ति मापण्याचा परिपाठ कांहीं लोकांत आहे. शक्तीच्या ह्या प्रमाणमापास फूटपौंड ह्मणतात. वाफेचीं यंत्रें, घोडे, माणसें, इत्यादिकांची शक्ति ह्या फूट-पौंडांनी मापतात. परंतु, पृथ्वीच्या आकर्षणांत ठिकठिकाणी अंतर असल्यामुळे पौंडाचें वजन ठिकठिकाणीं कमजास्त भरत असल्यावरून, ज्यांस जास्त बिनचूक माप ध्यावयाचें असतें ते कांहीं नियमित उष्णतामानाचें नियमित घनइंच पाण्याचें वजन प्रमाण धरून, त्यावरून बसविलेलें माप प्रमाण समजतात.

 एकादा दगड डोंगराच्या बाजूवरून घडघडत खालीं येतो; त्याच्या योगानें झाडेझुडपें चिरडून जातात. आणि एकादा दगड त्या डोंगराच्या माथ्यावर स्थिर बसलेला असतो. ह्या दोहोंमध्यें अंतर एवढेंच कीं, जो दगड घडघडत येतो त्याची शक्ति स्पष्ट दिसून येते, आणि माथ्यावर स्थिर असतो त्याची शक्ति गुप्त असते. त्या माथ्यावरच्या दगडाला थोडें ढकलतांच त्याच्या गुप्त शक्तीला प्रत्यक्ष स्वरूप देतां येतें.