पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११


शरीराच्या सर्व अवयवांच्या पोषणास आवश्यक आहे; तें खाणेपिणें तोंड करितें, पण त्याच्या योगानें तें केवळ आपणा स्वतःस किंवा आपणाजवळचे अवयव जे डोळे कान नाक ह्यांस मात्र तुष्ट आणि पुष्ट करितें असें नाहीं; तर, पाय, पोटऱ्या, मांड्या इत्यादि दूरच्या अवयवांसही तुष्ट आणि पुष्ट करितें. तसें आपल्या कृतीनें झालें पाहिजे. तरच ती सत्कृति होय. आणि पूर्वी सांगितला आहे असा उद्योग करणें ही कृति तशी आहे. ह्मणून ती आपण यथाशक्ति करावी हा आपला धर्म होय.

शक्ति.

 शक्ति ह्मणजे काम करण्याचें सामर्थ्य होय. किल्ली दिलेल्या घड्याळाच्या कमानींत शक्ति आहे असे आपण ह्मणतों; कारण, तिच्या योगानें घड्याळ चालतें. बंदुकीच्या दारूंत शक्ति आहे असं आपण ह्मणतों; कारण, ती पेटविली असतां तिचा भडका होऊन गोळ्या जोरानें उडविण्याचें किंवा दगड फोडण्याचें काम तिच्या हातून होतें. फेंकलेल्या दगडांत, किंवा सुटलेल्या बंदुकीच्या गोळींत शक्ति आहे, असे आपण ह्मणतों; कारण, त्यांस पुढे आलेल्या पदार्थांस फोडून जातां येतें. त्याचप्रमाणें, उंच जागी ठेवलेल्या दगडांत किंवा पाण्यांत शक्ति आहे असे आपण ह्मणतों; कारण, त्यांस खालीं पडतांना काम करितां येतें. तशी उष्णता ही एक शक्ति आहे; कारण, तिच्या योगानें पाण्याची वाफ करून यंत्रे चालवितां येतात. वीज ही एक शक्ति आहे; कारण तिच्या योगानें यंत्रें चालतात, आणि कधी कधीं घरें वगैरे पडून