पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०


झाली आहे. तरी, आह्मीं हिंदुस्थानवासी जनांनीं आपल्या पक्षी उद्योग करायाचा तो केलाच पाहिजे. त्याशिवाय कार्यसिद्धि व्हावयाची नाहीं.

 ह्मणून, ज्यांचे ठायीं स्वदेशहितबुद्धि जागृत झाली आहे, त्यांनीं, हस्तेंपरहस्तें, ह्या संबंधाचा उद्योग करून त्यास यथाशक्ति साह्य द्यावें. हें महापुण्य आहे. ह्यांत पापाचा लेशही नाहीं. आणि जेव्हां कधीं मागेंपुढे ह्या आमच्या राष्ट्रास इंग्लंडाप्रमाणें राज्यव्यवस्था प्राप्त होईल, तेव्हां, आपले वंशज अत्युत्तम सुख पावतील, आणि आनंद करितील; आणि त्या सुखाचे आणि आनंदाचे उत्पादक आणि वर्धक आपण होतों असें पाहून ते आपला बहुमान करितील. हेंच जिण्याचें खरें सार्थक्य होय. जार्ज वाशिंगटन ह्यास मरून गेल्यास आज नव्वद वर्षे झालीं; तरी, त्याला अमेरिकेंतल्या स्वतंत्र संस्थनांत देवासारखा भजत आहेत. ह्याचें कारण एवढेंच कीं, त्यानें जें काय केलें तें, केवळ आपल्या स्वतःच्या हितकरितां केलें नाहीं, तर, सगळ्या देशास चिरकाल एकसारखें सुखावह व्हावें असें केलें आहे. तुळसीदासांनी एके ठिकाणीं ह्मटलें आहे :-

दोहरा.

मुखिया मुखसो चाहिये
खानपान मुख एक
पाले पोषी सकल अंग
तुलसीसहित विवेक.

 ह्या ह्मणण्याचें तात्पर्य एवढेंच आहे कीं, खाणेपिणें हें