पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


कारचे तर्क काढीत आहे. परंतु, “सत्यमेव जयते " हा सिद्धांत अचल आहे. आमच्या राष्ट्राचा पक्ष खरा आहे. तो मि. ब्राडला ह्यांनीं उचलाला आहे. आणखी, मि. ब्राडला ह्यांचें ब्रीद असें आहे कीं, जें काम हातीं धरावयाचें तें तडीस नेल्यावांचून सोडावयाचें नाहीं. तेव्हां त्यांच्या ह्या उद्योगास खचीत यश येईल, असा पूर्ण भरंवसा आहे.


 तथापि "सहाय असिला असे तरिच शत्रुला मारवे" असें आहे. ह्मणून, मि. ब्राडला ह्यांचें ह्मणणें सें आहे कीं, ह्या कामीं हिंदुस्थानच्या लोकांनी उचल केली पाहिजे. ती उचल ह्मणजे एवढीच कीं, कौंसलांची अशी व्यवस्था करण्याविषयींच्या मागणीचे अर्ज पार्लमेंट सभेकडे पाठविले पाहिजेत; त्यांवर लाखों लोकांच्या सह्या पाहिजेत; ते अर्ज छापी नसावे; लिहिलेले असावे; त्यांच्या खालच्या सह्या कागदावर पाठपोट केलेल्या नसाव्या, एके आंगास केलेल्या असाव्या; आणि त्या अर्जाच्या घड्या न घालतां, चांगल्या सुरळ्या करून पार्लमेंटास सादर करण्याकरितां ते कोणा तरी एका पार्लमेंटच्या सभासदाकडे पाठवावे. ते पाठविण्यास तिकिटें लावायास नकोत. ते तसेच फुकट रवाना करावे, असा डांकेकडचा नियम आहे.

 "घनांबु न पडे मुखीं उघडिल्या विना पांखरें " असें ह्मटलें आहे. मेघ पाणी पाजण्यास सिद्ध झाला, तरी, पांखरानें चोंच उघडिली पाहिजे; चोंच उघडवणें हें मेघाच्यानें होणार नाहीं; तें पांखरानेंच केले पाहिजे. आमच्या राष्ट्राचें ह्मणणे ऐकायास इंग्लंडांतलें सरकार तयार आहे, आणि तें ऐकवायास ब्राडलासारखी थोर मंडळी तयार