पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/97

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७३
वसूल प्रांत गढाकोटा व मलठण .... ... ७०,०००
" "  येवलें व चोपडें .... .... ७३,५६०

 मिळून ६,६८,७४० रुपये व आणखी कांहीं किरकोळ बाबींचे ६,९५६ रुपये, मिळून एकंदर ६,७५,६९६ रुपये पावत असत. परंतु तेवढ्यानें फौजेचा खर्च ७,०९,२२४ रुपये भरून न येतां, ३३,५२८ रुपये तूट पडूं लागली. शिवाय बायजाबाईसाहेबांचे पेनशन तहाहयात असल्यामुळें त्यानें कायमच्या खर्चाची व्यवस्था होणार नाहीं, अशीही तक्रार उपस्थित झाली. तेव्हां उभय पक्षीं बरीच वाटाघाट होऊन बायजाबाईसाहेबांनी ८० लक्ष रुपये सरकारास कर्जाऊ द्यावे व त्याच्या व्याजांतून ह्या फौजेचा खर्च भागवावा असें ठरलें. ह्याप्रमाणें बायजाबाईसाहेबांस राज्याधिकार आपल्या ताब्यात ठेवण्यास, अप्रत्यक्ष रीतीने, सार्वभौम सरकारास, द्रव्यद्वारें खूष करणें भाग पडलें.

 कंपनी सरकारची भानगड संपल्यानंतर बायजाबाईसाहेबांनीं ग्वाल्हेरच्या राज्यकारभारांत आपले लक्ष्य चांगल्या रीतीनें घातलें. त्यांची एकंदर कारकीर्द इ. स. १८२७ पासून इ. स. १८३३ पर्यंत सरासरी साहा वर्षेंच चालली; परंतु तेवढ्या अवधीमध्यें त्यांनी मोठ्या दक्षतेनें व शहाणपणानें राज्यकारभार चालविला, आणि मराठ्यांच्या स्त्रिया राज्यकारभार चालविण्यास किती समर्थ असतात हें सर्व जगास महशूर केलें. ह्यांचे मुख्य दिवाण बापूजी रघुनाथ हे इ. स. १८२८ सालीं धारचा कारभार पाहण्याकरितां तिकडे निघून गेले. त्या वेळी त्यांनी इंदूरचे प्रख्यात मुत्सद्दी तात्या जोग ह्यांच्या शिक्षणानें राजकारणांत पूर्ण वाकबगार बनलेले गृहस्थ रावजी त्रिंबक चांदवडकर ह्यांस ग्वाल्हेरीस नेऊन, त्यांस आपल्या दिवाणगिरीचीं वस्त्रें दिली. रावजी त्रिंबक ह्यांचा नामनिर्देश सर जॉन मालकम ह्यांच्या इतिहासांत आला असून, हे गृहस्थ ग्वाल्हेर दरबारांत पुढें फार प्रसिद्धीस