बाजीराव गरजू असल्यामुळें त्यांनीं ह्या सर्व अटी मान्य केल्या. नंतर सर्जेराव घाटगे ह्यांनीं बाजीरावांची प्रकृति नादुरस्त असल्याचें ढोंग करून, हिंदुस्थानांत जाण्याचा बेत रहित केला; व प्रवरा नदीचे कांठीं, केशवं गोविंदाचे पिंपळगांवीं, मुक्काम केला. नंतर सर्जेराव घाटगे ह्यांनी दौलतराव शिंदे ह्यांस सर्व गोष्टी कळवून, त्यांस सर्वस्वीं अनुकूल करून घेतले. दौलतराव शिंदे ह्यांस हे सौंदर्यरत्न प्राप्त होण्याचा सुयोग आला हे पाहून परमानंद झाला; व त्यांनी सर्जेरावाचें ह्मणणे अक्षरशः मान्य करून, बाजीरावांस गादीवर बसविण्याचें अभिवचन दिले. ह्याप्रमाणे शेवटीं बाजीरावांस पेशवाईचें पद प्राप्त करून घेण्यास सर्जेराव घाटगे ह्यांच्या लावण्यवती कन्येचा उपयोग करणे भाग पडलें. स्त्रीसौंदर्यानें राजलक्ष्मीवर आपला पगडा बसविल्याची उदाहरणें इतिहासांत विपुल आहेत; तेव्हां ह्याबद्दल विशेष आश्चर्य मानण्याचे प्रयोजन नाहीं.
दौलतराव शिंदे बाजीरावांस अनुकूल झाल्यानंतर त्यांनीं बाळोबा तात्यांस कैद केलें; व बाजीरावांस परत बोलाविलें. नाना फडनवीस ह्यांची मसलत ह्या राजकारणांत होतीच. त्यामुळें त्यांनीं बाजीरावांस गादीवर बसविण्याची संधि साधून, त्यांच्याकडून दिवाणगिरीचीं वस्त्रें मिळविण्याचा यत्न चालविला होता. त्याप्रमाणें त्यांनी बाजीरावाशीं करार मदार करून, त्यांस सातारचे छत्रपतींकडून पेशवाईचीं वस्त्रें ता. ४ दिसेंबर इ. स. १७९६ रोजी आणून दिलीं. ह्याप्रमाणें पेशव्यांच्या गादीवर बाजीरावांची संस्थापना झाली.
बाजीरावांस गादी मिळाल्यानंतर ते नाना फडनवीस व दौलतराव शिंदे ह्यांच्या ओंजळीने पाणी पिऊं लागले. परंतु ते चंचलवृत्ति व कपटबुद्धि असल्यामुळें त्यांचे व नानांचें लवकरच वांकडे आलें, व त्यांनी नाना व दौलतराव ह्यांच्या त्रासांतून मुक्त होण्याचा प्रयत्न चालविला.
पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/51
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८