पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/52

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९

बाजीराव ह्यांस आपले मनोरथ सिद्धीस नेण्यास सर्जेराव घाटगे हें उत्तम साधन मिळाले होतें. त्यांचा त्यांनी बहुमान करून व त्यांस नानाप्रकारच्या लालची दाखवून, त्यांस पूर्णपणे अंकित केलें होतें. त्यामुळें ते त्यांच्या अनुषंगाते वागून त्यांची मनीषा तृप्त करण्यास तत्पर झाले होते. अनावर स्वार्थेच्छा व प्रबल महत्त्वाकांक्षा तृप्त करण्यास, सहज संधि प्राप्त झाल्यावर, तिचा फायदा सर्जेराव घाटग्यांसारख्या पुरुषाने घेतल्यास त्यांत आश्चर्य तें काय ? बाजीरावांनीं सर्जेरावास अशी मसलत दिली कीं, नानांस कैद केलें असतां तुह्मांस दौलतरावाची दिवाणगिरी मिळण्यास उशीर लागणार नाही. त्याप्रमाणें सर्जेराव घाटगे ह्यांनी ता. ३१ दिसेंबर १७९७ रोजीं नानांस कैद केलें. अर्थात् नाना कैदेंत गेल्यावर पेशव्यांच्या राज्याची सर्व कैद विसकटली जाऊन "बळी तो कान पिळी" असा प्रकार झाला. सर्जेराव घाटगे ह्यांनी द्रव्यलोभानें नानांच्या आप्त व इष्ट मंडळींचा छल केला; व बहुत अनन्वित कृत्यें केली. त्या सर्वांचें वर्णन करण्याचे हें स्थल नाहीं.
 नाना प्रधानगिरीवरून दूर झाल्यानंतर बाजीराव पेशवे ह्यांनी अमृतरावास आपले दिवाण नेमिलें, व दौलतराव शिंदे ह्यांच्याजवळ सर्जेराव ह्यांस आपला दिवाण नेमण्याबद्दल शिफारस केली. त्याप्रमाणें शिंदे ह्यांच्या दिवाणगिरीवर ह्या कारस्थानी गृहस्थाची योजना झाली. ह्या समयास दौलतराव ह्यांच्या इच्छेप्रमाणें बायजाबाईचा व त्यांचा विवाहसमारंभ घडून आला. हे लग्न पुणें मुक्कामीं इ. स. १७९८ चे मार्च महिन्यांत मोठ्या थाटाने झालें. ह्या वेळीं उत्सवप्रिय व तरुण शिंद्यांनीं जो समारंभ केला, तो फार हौसेचा व डौलाचा होता. त्यांनी ब्राह्मणभोजनें, नाचरंग, आतषबाजी वगैरेमध्यें अतिशय द्रव्य खर्च केलें. येणेंप्रमाणें 'दक्षिणची सौंदर्यलतिका' दौलतरावांस