Jump to content

पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७

चालविली होती कीं, बाळोबा तात्यांस कैद करून बाजीरावांस पेशवाईची गादी द्यावी; ह्मणजे बाजीरावांकडून तुह्मांस अहमदनगरचा किल्ला व परशुरामभाऊ पटवर्धनांची जहागीर मिळून १० लक्षांचा प्रांत बक्षीस मिळेल. परंतु ह्यांत त्यांस यश आलें नाहीं. बाजीराव व नाना ह्यांच्या गुप्त मसलती बाळोबा तात्यांस समजून, त्यांनीं बाजीरावांस कैद करून हिंदुस्थानांत पाठविण्याची तजवीज केली; व तें काम सर्जेराव घाटगे ह्यांस सांगितले. त्याप्रमाणें त्यांनी बाजीरावांस कैद करून उत्तर हिंदुस्थानांत स्वसैन्यानिशीं कूच केलें. ह्या प्रवासामध्यें बाजीरावांस एक युक्ति सुचली; व अखेर तीच त्यांस फलदायक झाली.
 बाजीराव ह्यांस सर्जेराव घाटगे ह्यांच्या सुस्वरूप कन्येची माहिती असून, तिजवर दौलतराव शिंदे ह्यांचे मन आसक्त झाले आहे ही गोष्ट ठाऊक होती. तेव्हां दौलतराव शिंदे ह्यांस अनुकूल करून घेण्यास, हें आमिष उत्तम आहे असें मनांत आणून, त्यांनी सर्जेराव घाटगे ह्यांजपाशीं संधान लाविले. बाजीराव बोलण्यांत फार चतुर व गोड असल्यामुळें त्यांनी सर्जेराव घाटगे ह्यांजवर आपली छाप बसवून त्यांना अनुकूल करून घेतले. सर्जेराव ह्यांस, आपली घाटग्यांच्या उच्च कुलांतील मुलगी कण्हेरखेडच्या पाटलाचे वंशांत द्यावी, हे प्रथम बरें न वाटून, त्यांनी पुष्कळ आढेवेढे घेतले. परंतु बाजीराव हे महाराष्ट्रप्रभु झाल्यानंतर आपले अनेक मनोरथ व महत्त्वाकांक्षा सिद्धीस जातील असें वाटून, पुढें सर्जेराव घाटगे हे ह्या गोष्टीस राजी झाले; व त्यांनीं बाजीरावांकडून तीन अटी लिहून घेतल्या. त्या येणेप्रमाणे:-(१) बाजीरावांस पेशवाईचा अधिकार मिळाल्यानंतर त्यांनी दोन कोट रुपये दौलतरावांस द्यावे; २) घाटग्यांची कागल येथील पुरातन जहागीर सर्जेरावांस द्यावी; आणि (३) आपण राज्यारूढ झाल्यानंतर दौलतराव शिंदे ह्यांची दिवाणागिरी सर्जेरावांस देववावी.