Jump to content

पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 175 crop)



भाग १० वा.
बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 175 crop) 2
शेवट.

 बंडाची परिसमाप्ति होऊन सर्वत्र शांतता झाल्यानंतर महाराणी बायजाबाईसाहेब ह्या ग्वाल्हेर मुक्कामींच महाराज जयाजीराव शिंदे ह्यांच्याजवळ राहिल्या होत्या. बायजाबाईसाहेबांचे वय पाऊणशें वर्षांपर्यंत पोहोचलें असून, दिवसेंदिवस वार्धक्याचा अंमल त्यांच्या शरीरावर सृष्टिधर्माप्रमाणें जास्त जास्त येत चालला होता. तथापि त्यांचा नित्यक्रम, पूजाअर्चा, कथापुराण वगैरे सर्व गोष्टी सुयंत्रित चालल्या होत्या. दिवसेंदिवस त्यांची देहयष्टि शक्तिहीन होत चालल्यामुळें त्यांचा घोड्यावर बसण्याचा व्यासंग कमी झाला होता. महाराज जयाजीराव शिंदे ह्यांची ह्या वृद्ध व पूज्य महाराणीवर केवळ मातेप्रमाणें भक्ति असून, त्यांनी त्यांच्या शुश्रूषेत किंवा सन्मानांत यत्किंचितही अंतर पडू दिले नाही. महाराज जयाजीराव हे बायजाबाईसाहेबांची वारंवार भेट घेत असत व त्यांच्याशी दोन प्रेमळ शब्द बोलून त्यांच्या मनास समाधान देत असत. अशा रीतीने बंडानंतर सुमारे तीन चार वर्षें लोटलीं.

 पुढे बायजाबाईसाहेबांची प्रकृति पिकल्या पानाप्रमाणें अगदीं क्षीण होत जाऊन इ. स. १८६३ च्या मे महिन्यांत त्या फारच अशक्त झाल्या, व त्यांचा काल अगदीं समीप आल्याची चिन्हें दिसूं लागलीं. त्यामुळें महाराज जयाजीराव ह्यांस विशेष चिंता उत्पन्न होऊन, त्यांच्या