Jump to content

पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१५०

 सर राबर्ट ह्यामिल्टन ह्यांच्यासारख्या चतुर मुत्सद्यांच्या लेखणींतून हे शब्द निघाले असल्यामुळें त्यांची योग्यता किती आहे, हें निराळे सांगण्याचें प्रयोजन नाहीं. ह्यावरून बायजाबाईसाहेबांनी ह्या प्रसंगी ब्रिटिश सरकाराशीं जें दोस्तीचें व एकनिष्ठपणाचें वर्तन केलें, तें त्यांस किती महत्त्वाचें व कल्याणप्रद झालें, हें आपोआप सिद्ध होतें. अर्थात् बायजाबाईसाहेबांचा व ब्रिटिश सरकारचा मागील राजकीय संबंध आणि प्रस्तुतचें त्यांचें सोज्वल व सप्रेम वर्तन ह्यांची तुलना केली, ह्मणजे ह्या वयोवृद्ध, सुशील, आणि सत्वस्थ राजस्त्रीसंबंधानें, मोरोपंतांच्या वाणीने,

आर्या
सुजनातें सुखवाया सुयशें वरिती परासुता राजे ।
निवविति चंदन गंधें छेदूं देती परा सुतारा जे ॥ १ ॥

किंवा, सुभाषितकारांच्या वाणीनें,

सुजनो न याति विकृतिं परहितनिरतो विनाशकालेऽपि ।
छेदेऽपि चन्दनतरुः सुरभयति सुखं कुठारस्य ॥ १ ॥

असे ह्मटल्यावांचून राहवत नाहीं.


बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 174 crop)