Jump to content

पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४६



गर्दींतून एकसारखी धांवत गेली; व बंडवाल्यांनीं तोफा व बंदुकी ह्यांचा मारा चालविला असतांना, त्यांतून प्रवेश करून, महाराजांचा शोध करूं लागली. तेथें महाराज सुखरूपपणें आग्र्यास गेले अशी जेव्हां तिची खात्री झाली, तेव्हां ती त्या गर्दीतून तशीच परत आली. तिचें धारिष्ट व शौर्य पाहून सर्व लोकांस परमावधीचें आश्चर्य वाटलें. असो. येणेंप्रमाणें खुद्द शिंदे सरकार व त्यांच्या सर्व राजस्त्रिया बंडवाल्यांस अनुकूल न होतां, त्यांच्या तावडीतून निसटून सुरक्षितपणें ग्वाल्हेर राजधानीच्या बाहेर गेल्या.

 शिंदे सरकार ग्वाल्हेरीहून निघून गेल्यानंतर बंडवाल्यांनी ता. १ जून इ. स. १८५८ पासून अठरा दिवसपर्यंत तेथें आपलें साम्राज्य चालविलें. त्या अवधीमध्यें त्यांनी तेथें जी बेबंदबादशाही स्थापन केली, तिचें वर्णन झांशीच्या राणीच्या चरित्रांत सादर केले आहे. ह्यास्तव त्याची पुनरुक्ति करण्याचें येथें प्रयोजन नाहीं. ता. १८ जून इ. स. १८५८ रोजीं सर ह्यू रोज ह्यांचे सैन्य ग्वाल्हेरीवर चालून आलें, व त्यांचा व बंडवाल्यांचा घनघोर रणसंग्राम होऊन त्यांत विरुद्ध पक्षाकडील रणशूर सेनानायिका झांशीची राणी लक्ष्मीबाई ही धारातीर्थीं पतन पावली; आणि बंडवाल्यांची वाताहत होऊन ग्वाल्हेरनगरी इंग्रज सेनापतीच्या ताब्यांत आली. नंतर तेथें ता. १९ रोजीं, सर ह्यू रोज, सर रॉबर्ट ह्यामिल्टन, व मेजर म्याक्फर्सनप्रभृति विजयी योद्ध्यांनी अलिजाबहादरांच्या लष्कर राजधानींत प्रवेश केला, आणि आपले दोस्त परम विश्वासू महाराज जयाजीराव शिंदे ह्यांना गादीवर बसविण्याचा विजयोत्साहपूर्वक प्रचंड समारंभ केला. ग्वाल्हेरचें विजयवृत्त ऐकून गव्हरनरजनरल लॉर्ड क्यानिंग ह्यांस अत्यंत हर्ष झाला. त्यांनी शिंदे सरकारास राज्यारूढ करण्याबद्दल पूर्ण परवानगी दिली; आणि हें आनंदकारक वर्तमान सर्व हिंदुस्थानभर कळवून, प्रत्येक शहरीं शिंदे सरकारास