Jump to content

पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४५

कारच्या सैन्याशीं लढाई करून ग्वाल्हेर सर केली. ह्या वेळीं महाराज जयाजीराव शिंदे व दिवाण दिनकरराव ह्यांना इंग्रज सरकारच्या आश्रयास आग्र्यास पळून जाणें भाग पडलें. ह्या भयंकर प्रसंगीं बायजाबाईसाहेब ह्या ग्वाल्हेरीस होत्या. त्यांना सर्व ग्वाल्हेरचें राज्य अर्पण करण्याचें बंडवाल्यांनीं आमिष दाखविलें; परंतु बाईसाहेबांच्या दृढ निश्चयापुढें त्यांचा अगदी निरुपाय झाला. बंडवाल्यांचे अध्वर्यु रावसाहेब पेशवे ह्यांचा, शिंदे सरकार पळून गेल्यामुळें, पराकाष्ठेचा निरुत्साह झाला; आणि तशांत, बायजाबाईसाहेब अनुकूल होत नाहींत, हें पाहून तर त्यांचा सर्व मनोरथ ढासळून पडला.

 बायजाबाईसाहेब ह्यांनीं रावसाहेब पेशवे ह्यांची सर्व पत्रें मध्यहिंदुस्थानचे पोलिटिकल एजंट सर रॉबर्ट ह्यामिल्टन ह्यांच्याकडे पाठविली; आणि आपण आपल्या खास तैनातींतील लोकांसह महाराज शिंदे सरकाराप्रमाणें इंग्रज सैन्यास जाऊन सामील झाल्या. शिंदे सरकारच्या सर्व राजस्त्रिया बंडवाल्यांनीं ग्वाल्हेर सर केल्यानंतर नरवरास गेल्या. त्या वेळीं प्रथमतः, बायजाबाईसाहेब त्यांच्याबरोबर गेल्या कीं काय, हे बरोबर समजत नाहीं. तथापि सर ह्यू रोज ग्वाल्हेरीवर चालून आले, त्या वेळीं ह्या त्यांच्या सैन्याबरोबर होत्या, असा पुरावा सांपडतो. बंडवाल्यांच्या आटोक्यांतून ज्या वेळी ह्या राजस्त्रिया निसटून गेल्या, त्या वेळीं बायजाबाईसाहेबांची नात गजराजा हिनें अलौकिक शौर्य व धैर्य व्यक्त केलें. ही स्त्री बायजाबाईसाहेबांच्या शिक्षेमध्यें घोड्यावर बसण्यांत व तरवार चालविण्यांत तरबेज झाली असून हिच्या अंगी शौर्यगुण चांगला वसत होता. ग्वाल्हेर येथें बंडवाल्यांची धामधूम चालली असतांना, बायजाबाईसाहेबांच्या राजवाड्यामध्यें, शिंदे सरकारावर कांहीं बिकट प्रसंग गुदरल्याची वार्ता आली. त्या वेळीं गजराजासाहेब ही घोड्यावर स्वार होऊन व हातामध्यें नंगी समशेर घेऊन, शिंदे सरकारच्या राजवाड्यांत बंडवाल्यांच्या
  १०