बायजाबाईसाहेबांनी ह्या प्रसंगी महाराज जयाजीराव शिंदे व दिवाण दिनकरराव ह्यांच्या मसलतीप्रमाणें वागून, युरोपियन लोकांचें व त्यांच्या स्त्रियांचें संरक्षण करण्याचे काम चांगली मदत केली. इ. स. १८५७च्या मे महिन्यांत, ग्वाल्हेर येथील सैन्यानें ज्या वेळीं बंडाचा झेंडा उभारला, व आपलें रुद्रस्वरूप व्यक्त करून रेसिडेन्सीवर हल्ला केला, त्या वेळीं महाराज जयाजीराव शिंदे ह्यांनीं रेसिडेन्सीमधील युरोपियन लोक वे त्यांची बायकामुलें ह्यांस आपल्या राजवाड्यांत नेऊन तेथे त्यांचे जीव बचावले. त्या समयीं बायजाबाईसाहेब व शिंदे सरकारच्या महाराणी ह्या उभयतांनी त्यांस अभय देऊन त्यांची भीति दूर केली; व आपल्या खास मुतपाकखान्यांतून उत्तम उत्तम पक्वान्नें व निरनिराळे पदार्थ पाठवून त्यांच्या जेवणखाणाची उत्तम व्यवस्था केली. ही गोष्ट मेजर म्याक्फर्सन ह्यांनी ता. १० फेब्रुवारी इ. स. १८५८ रोजीं आग्र्याहून पाठविलेल्या रिपोर्टामध्यें दाखल केली आहे. ह्या वेळीं बायजाबाईसाहेबांनी जी मदत केली, तिची प्रशंसा करावी तेवढी थोडी आहे.
ह्यानंतर ग्वाल्हेर येथें बंडवाल्यांचे प्राबल्य विशेष झालें, व शिंदे सरकारचें सर्व सैन्य फितलें जाऊन युरोपियन लोकांचे जीव सुरक्षित राहण्याची आशा नाहींशी झाली. तेव्हां महाराज जयाजीराव शिंदे व दिवाण दिनकरराव ह्यांनी त्यांस सुरक्षितपणें आग्रा येथें पोहोंचविले. पुढें कांहीं दिवसांनीं ग्वाल्हेरची स्थिति अतिशय भयंकर झाली, व बंडवाल्यांनी सर्व दिशा व्यापून टाकल्या. त्या वेळीं चतुर दिवाण दिनकरराव ह्यांनी फार शहाणपणाने राज्यसूत्रें चालवून, ह्या बंडवाल्या सैन्यास तेथेंच थोपवून ठेविले. त्यामुळें आग्रा येथील किल्याचा आश्रय करून राहिलेल्या सर्व युरोपियन लोकांचे रक्षण झालें. इ. स. १८५८ च्या मे महिन्यांत, बंडवाल्यांचे पुढारी तात्या टोपे, रावसाहेब पेशवे, झांशीची राणी, बांदेवाले नबाब हे ग्वाल्हेरीवर चालून आले, व त्यांनीं शिंदे सर