पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्त्रियांपैकीं एक सुप्रसिद्ध स्त्री असून त्यांचे चरित्र वाचनीय व विचारयोग्य असे आहे. त्याच्या योगानें महाराष्ट्र स्त्रियांच्या अंगीं राज्यकारभार चालविण्याची किती धमक असे, व त्या मर्दुमकीच्या कामांतही कशा निपुण असत, हे चांगले कळून येतें. मराठ्यांच्या स्त्रिया ह्मणजे गोषामध्यें असणारे बंदीवान, अशी जी प्रचलित समजूत आहे, ती सर्वथा चुकीची आहे, हें ह्या चरित्रावरून दिसून येते. मराठ्यांच्या स्त्रिया शौर्यपराक्रमाच्या गुणांत परिपूर्ण असून, घोड्यावर बसणें, भाला फेकणें वगैरे शौर्यविद्या त्यांस चांगली अवगत असे, व गोषाचा प्रतिबंध त्यांना त्या कामीं फारसा होत नसे, असे इतिहासावरून सिद्ध होतें. पेशवाईच्या अखेर अखेर देखील मराठे स्त्रियांना पुष्कळ स्वातंत्र्य होतें, व त्या घोड्यावर बसण्यांत चांगल्या तरबेज होत्या, अशी साधार माहिती मिळते. मि० एल्फिन्स्टन ह्यांनी “पेशव्यांची बायको भररस्त्यांतून देवदर्शनाकरितां पायीं जात असे, आणि घोड्यावर अथवा उघड्या पालखीत बसून सर्व लवाजम्यासह फिरत असे.” असे लिहिलें आहे; आणि स्कॉटवेरिंगसाहेबांनी बाजीरावसाहेब पेशव्यांची बायको लोकांच्या गर्दीतून घोडा भरधाव फेंकीत जातांना प्रत्यक्ष पाहिल्याचा उल्लेख केला आहे. हीच मर्दानी विद्या बायजाबाईसाहेबांसही अवगत होती व यशवंतराव होळकराची मुलगी भीमाबाई हिलाही येत होती. पहिलीने सर आर्थर वेलस्लीसाहेबांस आपली अश्वारोहणविद्या व्यक्त करून आश्चर्यचकित केलें, व दुसरीनें महिदपुरच्या लढाईनंतर सर जॉन मालकम ह्यांस आपले अलौकिक शौर्य व्यक्त करून तोंडांत बोट घालावयास लाविलें . ह्या गोष्टी सांप्रतच्या स्थितींत विचार करण्यासारख्या नाहींत असे कोण ह्मणेल ?


1. "After the battle of Mahidpore, the Bheema Bai, Holkar's daughter, with a small body of retainers, for a long time kept the country in a flame. One day Sir John Malcolm was moving with a large force, when the lady was seen on horseback on a neighbouring eminence, attended by only one follower. The order was given to surround the hillock so as to ensure her capture. The slave escaped before the re