पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशा प्रेमळ व रसाळ वाणीने पतिकृपेचा महिमा वर्णन करून ईशस्तवनांत कालक्षेप करणाऱ्या कविराज कै. बापूसाहेब कुरुंदवाडकर ह्यांच्या पत्नी, ह्या स्त्रियाही कमी योग्यतेच्या नाहींत. परंतु त्यांची चरित्रें अथवा गुणवर्णनें प्रसिद्ध नसल्यामुळें निर्जन अरण्यांतील जातिकुसुमाप्रमाणे त्यांचा कीर्तिसौरभि कालरूपी वायू भक्षण करीत आहे.

 ह्या सर्व स्त्रियांची चरित्रें जसजशी प्रसिद्ध होतील, त्याप्रमाणें आपल्या राष्ट्रांतील स्त्रियांचे उत्तम गुण व त्यांची योग्यता अधिक प्रकाशित होऊन भावी पिढीस त्याचा फार फायदा होईल. परंतु हे काम इतिहासग्रंथ व चरित्रें ह्यांवांचून होणे दुरापास्त आहे. ह्याकरितां प्रत्येकाने यथामति व यथाशक्ति इकडे लक्ष्य देणें अवश्य आहे.

 हाच हेतु मनांत धरून झांशीच्या राणीचे चरित्र महाराष्ट्र भाषेत स्वतंत्र माहिती गोळा करून इ० स० १८९४ सालीं प्रसिद्ध करण्यांत आलें. त्याचा अनेक रसिक व सहृदय वाचकांनीं मोठ्या प्रेमभावानें स्वीकार केला, हें कळविण्यास फार संतोष वाटतो. ह्या पुस्तकास जरी महाराष्ट्रांत चांगला लोकाश्रय मिळाला नाहीं, तरी त्याची गुजराथी, बंगाली वगैरे परभाषांतून जीं भाषांतरें प्रसिद्ध झाली आहेत, तींच त्याच्या लोकप्रियतेची साक्ष होत. अशा प्रकारें प्रथम प्रयत्नास प्रोत्साहन मिळाल्यामुळें इतिहासप्रसिद्ध व कर्तृत्वशाली स्त्रियांची हळूहळू चरित्रमाला गुंफण्याचा आमचा दृढ संकल्प झाला आहे. त्या मालेचें "महाराणी बायजाबाईसाहेव शिंदे ह्यांचे चरित्र" हें द्वितीय पुष्प होय.

 बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे नांव जुन्या लोकांच्या मुखांतून मात्र आजपर्यंत ऐकू येत होतें; परंतु त्यांचे सुसंगत व साधार असें एकही चरित्र प्रसिद्ध नव्हतें. तें प्रसिद्ध करण्याच्या उद्देशानें अनेक इंग्रजी ग्रंथ व जुने लेख ह्यांतून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात् हा अगदीं पहिला प्रयत्न असल्यामुळें हे चरित्र सांगोपांग व परिपूर्ण तयार करण्याइतकी विपुल माहिती मिळण्याचा संभव नाहीं. ह्मणून जेवढी माहिती उपलब्ध झाली, तेवढी ह्या चरित्रामध्यें दाखल करून हें ऐतिहासिक चरित्र महाराष्ट्र वाचकांस सादर केले आहे. बायजाबाईसाहेब शिंदे ह्या गेल्या शतकांतील राजकारणी व कर्तृत्वशाली