Jump to content

पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११३

स. १८५३ पर्यंत मंत्रिमंडळाचे विद्यमानें चालला. नंतर महाराज जयाजीराव शिंदे हे वयांत आले, व त्यांस हिंदुस्थान सरकारानें सर्व राज्याची मुखत्यारी दिली.

 येणेंप्रमाणें स्थिरस्थावर झाल्यानंतर बायजाबाईसाहेब ह्या पुनः उत्तर हिंदुस्थानांत गेल्या, त्या मग अखेरपर्यंत तिकडेच राहिल्या. महाराज जयाजीराव शिंदे ह्यांनी आपल्या वृद्ध आजीबाईंचा परामर्ष उत्तम रीतीनें घेऊन, त्यांस जनकोजीरावांच्या कारकीर्दींत जीं दुःखें भोगावी लागलीं, त्यांचा विसर पडेल अशा रीतीनें प्रेमादरपूर्वक वागविलें, हें त्यांस अत्यंत भूषणावह होय. बायजाबाईंनीं आपली नात जयाराजा ही खानविलकर घराण्यांत दिली होती; तिची कन्या चिमणाराजा ही जयाजीराव शिंदे ह्यांस देऊन ह्या उभयतांशीं वात्सल्यभावाचें वर्तन केलें. बायजाबाईसाहेब ह्या जयाजीराव महाराजांच्या कारकीर्दींत उज्जनी व लष्कर येथेंच राहत असत. ब्रिटिश सरकारानेंही इ. स. १८४४ नंतर त्यांचे सर्व प्रतिबंध दूर करून, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्याचें फळ त्यांस इ. स. १८५७ सालीं फार उत्तम प्रकारचें मिळालें.


बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 137 crop)