पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 138 crop)
भाग ८ वा

,

बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 138 crop) 2
बायजाबाईसाहेबांच्या कांही गोष्टी.

 बायजाबाईसाहेबांच्या राजकीय चरित्राविषयीं ह्मणजे त्यांच्या राज्यकारभाराविषयीं जी माहिती उपलब्ध झाली आहे, ती स्वतंत्र भागांत निवेदन केली आहे. आतां त्यांच्या खाजगी चरित्राविषयीं-ह्मणजे स्वभाव, दिनचर्या, वर्तनक्रम, औदार्य वगैरे गोष्टींविषयीं दोन शब्द सांगणे जरूर आहे. बायजाबाईसाहेब ह्यांची दिनचर्या किंवा रोजनिशी लिहून ठेविलेली अद्यापि उपलब्ध झालेली नाहीं. तेव्हां त्यांच्या खाजगी चरित्राबद्दल पाश्चिमात्य लोकांनी आपल्या प्रवासवृत्तांतामध्यें जी माहिती लिहिली आहे व जे उल्लेख नमूद केले आहेत, त्यांच्यावर सर्वस्वीं अवलंबून राहणें भाग आहे. अशा प्रकारचे पाश्चिमात्य ग्रंथकारांचे लेख व ग्वाल्हेर दरबारातील माहितगार व जुन्या लोकांच्या मुखांतून ऐकलेल्या आख्यायिका ह्यांच्या आधाराने हा भाग तयार केला आहे.

स्वरूप.

 बायजाबाईसाहेब ह्या फार सौंदर्यवती होत्या अशी ख्याति आहे. ह्यांच्या लावण्यास लुब्ध होऊन दौलतराव शिंदे ह्यांनी तत्प्राप्त्यर्थ शेवटच्या बाजीरावास गादीवर बसविलें, व त्यांचे वडील सर्जेराव घाटगे ह्यांस आपली दिवाणगिरी दिली, ही गोष्ट मागें सांगितलीच आहे. ह्यांच्या रूपगुणसंपन्नतेसंबंधाने एका एतद्देशीय ग्रंथकाराने "ही शहाणी, सद्गुणी, सुशील तशीच लावण्यरूपवती होती" असें वर्णन केलें आहे. कित्येक आंग्ल स्त्रियांनींही ह्यांच्या स्वरूपाचें व दरबाराचें प्रसंगानुरूप जें वर्णन लिहिलें आहे, त्यांत बरीच विस्तृत माहिती दिली आहे.