पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११२



वंशजांपैकीं हणमंतराव ह्यांचा मुलगा भगीरथराव ह्यांस ता. १९ फेब्रुवारी इ. स. १८४३ ह्मणजे माघ वद्य ५ शके १७६४ रोजीं दत्तक देऊन त्यांचे नांव महाराज जयाजीराव असें ठेविलें, व राज्यकारभार आपल्या हातीं घेतला. परंतु पुढें मामासाहेब व दादासाहेब खाजगीवाले ह्या दरबारांतील प्रमुख पुढाऱ्यांचा बेबनाव होऊन सर्वत्र घोंटाळा झाला; व राज्यामध्यें अशांतता उत्पन्न होऊन ग्वाल्हेर दरबार व इंग्रज सरकार ह्यांच्यामध्येंही तेढ उत्पन्न झाली. अखेर हिंदुस्थानचे गव्हरनरजनरल ह्यांस ग्वाल्हेर दरबारातील राजकारणाचे घोंटाळे नाहींसे करण्याकरितां ग्वाल्हेर येथें स्वतः येण्याचा प्रसंग आला. त्याप्रमाणें त्यांची स्वारी ग्वाल्हेरजवळ हिंगोणा येथें आली. तेथें त्यांच्याशीं तडजोड करण्याकरितां दरबारच्या वतीने बापू शितोळे हे गेले होते. परंतु सुलभ रीतीनें व सरळपणानें ह्या राजकारणाचा निकाल न लागतां, शिंद्यांचें सैन्य व इंग्रजांचे सैन्य ह्यांची महाराजपूर व पनियार येथें लढाई झाली.

 महाराजपूर व पनियार येथें शिंद्यांच्या पक्षास अपयश आल्यानंतर, गव्हरनरजनरलसाहेबांनीं महाराज जयाजीराव शिंदे ह्यांस आपल्या ताब्यात घेऊन, त्यांस ता. १३ जानेवारी इ. स. १८४४ रोजीं पुनः गादीवर बसविले; व ते अज्ञान आहेत तोपर्यंत त्यांचा राज्यकारभार पाहण्याकरितां रामराव फाळके, देवराव जाधव, मुनशी राजे बळवंतराव बहादुर, उदाजीराव घाटगे, मुल्लाजी शेट आणि नारायणराव भाऊ पोतनीस ह्या सरदारांचे मंत्रिमंडळ नेमिलें. ह्या मंत्रिमंडळाशीं तह करून, शिंदे सरकारानें सैन्याच्या खर्चाकरितां १८ लक्षांचा मुलूख कंपनी सरकाराकडे नेमून द्यावा, व ग्वाल्हेर संस्थानांत फक्त ६००० स्वार, ३००० पायदळ, ३२ तोफा आणि २०० गोलंदाज इतकें सैन्य ठेवावे वगैरे महत्वाचे मुद्दे ठरविले. ह्याप्रमाणें तह झाल्यानंतर ग्वाल्हेर येथे शांतता स्थापित झाली व संस्थानचा राज्यकारभार इ.