Jump to content

पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 105 crop)
भाग ६ वा.
बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 105 crop) 2
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव.

 संस्थानामध्ये कलह उत्पन्न होण्यास विशेषेंकरून राजाचे दुर्गुण व कुसंगति हीं बहुधा कारण असतात. मग त्यांत कित्येक स्वार्थसाधु व कपटपटु लोकांच्या नीच कृतींची भर पडून, त्या कलहाग्नीच्या ज्वाळा अतिशय जोरानें पेट घेतात; आणि लवकरच संस्थानाची राखरांगोळी करितात. महाराज जनकोजीराव व बायजाबाईसाहेब ह्यांच्यामध्ये जो विग्रह उत्पन्न झाला, त्याचें कारण महाराजांची अल्पबुद्धि व दुर्जनसंगति हींच होत. महाराजांचे दत्तविधान होऊन त्यांस इ.स.१८२७ सालीं गादीवर बसविले, त्या वेळी त्यांचे वय अवघें ११ वर्षांचें होतें. अर्थात् इतक्या अल्पवयी मुलाच्या हातीं अधिकार देणें अगदीं अयोग्य व शास्त्रदृष्टया देखील अप्रयोजक होतें, हें कोणीही सुज्ञ मनुष्य कबूल करील. बायजाबाईसाहेब ह्यांनी महाराज अल्पवयी असल्यामुळें रीतीप्रमाणें संस्थानाचा राज्यकारभार आपण स्वतः उत्तम प्रकारें चालविला, व महाराज वयांत येईपर्यंत तो तसाच चालवावा अशी त्यांची इच्छा असणें साहजिक आहे. परंतु महाराज गादीवर बसून दोन तीन वर्षें झालीं नाहींत, तोंच दरबारच्या स्वार्थसाधु मंडळीच्या चिथावणीनें ह्मणा, किंवा अन्य कांहीं कारणांमुळे ह्मणा, महाराज जनकोजीराव ह्यांचें वर्तन बायजाबाईसाहेबांस असह्य व अपमानकारक वाटू लागले, व त्यांनी